देशातील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात! २४ तासांत ३० हजार नवे रुग्ण, ५४१ जणांचा मृत्यू | पुढारी

देशातील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात! २४ तासांत ३० हजार नवे रुग्ण, ५४१ जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क

देशात हळूहळू कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३०,७५७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ५४१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ६७ हजार ५३८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात ३ लाख ३२ हजार ९१८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट २.६१ टक्क्यांवर आला आहे. देशातील आतापर्यंत ४ कोटी १९ लाख १० हजार ९८४ लोकांनी कोरोनावर मात केली आहे.

याआधीच्या दिवशी देशभरात ३० हजार ६१५ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ५१४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला होता. दरम्यान ८२ हजार ९८८ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. बुधवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९७.९४ टक्के नोंदवण्यात आला होता. तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर २.४५ टक्के आणि आठवड्याचा कोरोना संसर्गदर ३.३२ टक्के नोंदवण्यात आला होता.

कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १७४ कोटी २४ लाख ३६ हजार २८८ डोस देण्यात आले आहेत. यातील ४१.५४ लाख डोस मंगळवारी दिवसभरात देण्यात आले. तर, खबरदारी म्हणून आतापर्यंत १.७९ कोटी बूस्टर डोस देण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १७१ कोटी ४८ लाख ८९ हजार २६० डोस पैकी ११ कोटी ८८ लाख ५९ हजार ३५६ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ७५ कोटी ४२ लाख ८४ हजार ९७९ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील १२ कोटी ५१ लाख ६७७ तपासण्या मंगळवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

ब्राझीलमध्ये दीड लाख नवे रुग्ण, १ हजार मृत्यू

दरम्यान, ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. येथे एका दिवसात १ लाख ४७ हजार ७३४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात १,०८५ जणांचा मृत्यू झाला आहे. मेक्सिकोत एका दिवसात ५२० जणांचा मृत्यू झाला आहे.

फ्रान्समध्ये निर्बंध शिथिल

कोरोना रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने स्वित्झर्लंडने कोविड-१९ निर्बंध हटवले आहेत. फ्रान्सनेदेखील निर्बंध शिथिल केले आहेत. तर ऑस्ट्रिया मार्चमध्ये निर्बंध हटवणार असल्याचे वृत्त आहे.

Back to top button