रामशेज किल्ल्यावर वणवा ; साडेचार हेक्टरवरील रानगवत आगीच्या भक्षस्थानी

रामशेज किल्ल्यावर भडकलेला वणवा
रामशेज किल्ल्यावर भडकलेला वणवा
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या अनेक दिवसांपासून वनक्षेत्रांमध्ये आग भडकण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सोमवारी (दि. 21) सायंकाळी सहाच्या सुमारास शहरालगत असलेल्या रामशेज किल्ल्यावर वणवा पेटला होता. तीन तासांच्या प्रयत्नानंतर नऊच्या सुमारास वनविभागाने स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, तोपर्यंत किल्ल्यावरील साडेचार हेक्टर गवत आगीच्या भक्षस्थानी पडले.

रामशेज किल्ला परिसरातील कॅम्पा क्रमांक-621 मधील राखीव वनामध्ये अचानक वणव्याचा भडका उडाला. वाळलेले रानगवत हवेच्या साहाय्याने वेगाने पेटल्यामुळे आगीच्या ज्वाला भडकल्या. घटनेची माहिती मिळताच, नाशिक पूर्व वनविभागाने वनपाल अशोक काळे, वनरक्षक योगिता काळे, योगिता खिरकाडे, शांताराम शिरसाठ, रघुनाथ शिंगाडे, गोरख गांगुर्डे, एस. एस. कामटी आदींनी घटनास्थळी धाव घेत पारंपरिक पद्धतीचा अवलंब करीत वनक्षेत्रात लागलेली आग विझविण्यास सुरुवात केली.

वार्‍याचा वेग अधिक असल्याने आगीवर नियंत्रण मिळविताना अडचणी येत होत्या. आशेवाडी तसेच तुंगलदरा परिसरातील पंकज गायकवाड, संतोष चव्हाण, कुणाल जगताप, महेंद्र बोडके, अभिजित बोडके, विलास बगर, वाळू बगर, भाऊराव चोथे आदी ग्रामस्थांनी वनविभागाच्या पथकाला मदत करीत आग आटोक्यात आणली. दरम्यान, पुढील वर्षी गवत चांगले येण्यासह शिकारीच्या उद्देशाने समाजकंटकांकडून आग लावण्यात आल्याचा अंदाज आहे. उपद्रवी समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

जाळपट्ट्यांचे काम प्रगतिपथावर
वनविभागाने वणवे रोखण्यासाठी वनक्षेत्रांमध्ये जाळपट्टे घेण्याचे काम हाती घेतले आहे. सद्यस्थितीत जाळपट्ट्यांचे काम प्रगतिपथावर आहे. 28 फेब—ुवारीपर्यंत जाळपट्टे घेण्यात येणार असल्याचे वरिष्ठ वनाधिकार्‍यांनी सांगितले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news