सौदी – भारत जवळीक | पुढारी

सौदी - भारत जवळीक

गत आठवड्यात सौदी अरेबियाचे सेनाप्रमुख लेफ्टनंट जनरल फहद बिन अब्दुल्ला मोहम्मद अल-मुटैर तीन दिवसांच्या भारत दौर्‍यावर येऊन गेले. पाकिस्तानला या दौर्‍यानंतर मिरच्या झोंबल्या आहेत. आतापर्यंत सौदी अरेबिया हा पाकिस्तानचा जिवाभावाचा मित्र म्हणून ओळखला जात होता. परंतु; भारताच्या कूटनीतीमुळे त्याने भारताशी जवळीक वाढविण्यावर भर दिला आहे. आतापर्यर्ंत भारत आणि सौदी अरेबिया यांनी वाणिज्यिक आणि परस्पर संबंध वृद्धिंगत करण्यावर भर दिला होता. परंतु; आता संरक्षण क्षेत्रातही हे दोन देश एकत्र येत आहेत, हे पाहून पाकिस्तान बेचैन झाला आहे. पाकिस्तान हा देश अरब देशांतून मिळणार्‍या खैरातीवर गुजराण करीत आहे. भारत आणि सौदीचे वाढते संबंध पाहून इम्रान खान घाबरले तर आहेतच; पण तेथील विरोधी पक्ष आणि जनताही आता या नव्या समीकरणाला इम्रान सरकारला जबाबदार धरीत आहे.

जन. फहद बिन अब्दुल्ला यांच्या भेटीचा भारताने खूप हुशारीने वापर करून घेतला. जन. फहद यांचे दिल्लीत गार्ड ऑफ ऑनर देऊन स्वागत झाले. भारताचे सेनाप्रमुख जनरल मनोज नरवणे स्वत: तेव्हा उपस्थित होते. दोन्ही लष्करप्रमुखांमध्ये आर्थिक प्रगती, दहशतवादला विरोध, पर्यावरण संवर्धन, संरक्षण सहकार्य आदी मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली.

तथापि, जनरल फहद यांच्या भेटीचे पाकिस्तानात जोरदार पडसाद उमटले. विरोधी पक्षाने या मुद्द्यावर सरकारला घेरले आहे. विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंटने, ही भेट म्हणजे इम्रान सरकारचे परराष्ट्र धोरण फसल्याची पोेचपावती असल्याचे म्हटले आहे. पीडीएम नेत्यांनी म्हटले आहे की, सौदी अरब हा पाकिस्तानचा सच्चा दोस्त होता. परंतु; तो आता भारतासोबत आपले संबंध मजबूत करीत आहे. इम्रान सरकार सत्तेवर आल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर कूटनीतीमध्ये पाकिस्तान सातत्याने पराभूत होत आहे. विरोधी पक्षाप्रमाणेच पाकिस्तानी जनताही सरकारवर नाराज आहे. इम्रान खान यांच्या चुकीच्या धोरणामुळे सौदी अरब भारताचा मित्र बनल्याचे तेथील जनतेचे म्हणणे आहे. एका नागरिकाने सरकारला सौदी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या 2019 मधील इस्लामाबाद दौर्‍याची आठवण करून देताना म्हटले की, प्रिन्स यांनी पाकिस्तानात रिफायनरी स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु; भारताच्या सांगण्यावरून नंतर त्यांनी नकार दिला. पाकच्या शब्दाला किंमत उरली नाही.

संबंधित बातम्या

सौदीकडे पैसा जास्त असला तरी लढण्यासाठी सैनिक नाहीत, युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तान त्यांना आपले सैनिक पाठवून देईल, असे आश्वासन देऊन त्यांच्याकडून पाक आर्थिक मदत मिळवत होता. शिवाय त्यांच्या सैन्याला प्रशिक्षण देण्याचे नाटक करत होता. परंतु; येमेनमध्ये बंडखोरांशी टक्कर देता देता सौदी सेना आता अनुभवी बनली आहे. शिवाय त्यांना अमेरिकेकडून शस्त्रास्त्रे आणि मदत मिळत आहे. त्यामुळे सौदीला पाकिस्तानची गरज उरली नाही. त्यापेक्षा भारत त्यांना आता बाजारपेठ, सैनिकी मदत, शस्त्रास्त्र पुरवठा आणि व्यापार या सवार्र्ंच्या द़ृष्टीने सोयीचा वाटतो. ही गोष्ट पाकिस्तानला ठसका लागण्यासाठी पुरेशी आहे. या सगळ्या घटनाक्रमामध्ये पाकिस्तानाते सर्वात जास्त काहूर माजले ते एका फोटोमुळे. जन. फहद आणि जन. नरवणे यांच्या भेटीत मागील भिंतीवर पाकिस्तानी सेनेेने ढाक्यामध्ये शरणागती पत्करून बांगलादेश मुक्तीच्या करारावर सह्या केल्याच्या घटनेचे छायाचित्र होते. तो फोटो पाकिस्तानच्या डोळ्यात खूपत आहे. दोन्ही लष्करप्रमुख भेटताना भारताने जाणूनबुजून या फोटोचा वापर केला, असा शंखनाद पाकिस्तानातील मीडियाने सुरू केला आहे. हाच फोटो सौदी अरेबियातील प्रमुख दैनिकांनी प्रसिद्ध केल्यामुळे पाकिस्तानच्या जखमेेवर जास्तच मीठ चोळले गेले. जन. फहद यांच्या दौर्‍याने दोन्ही देशांना काय फायदा होईल हे आगामी काळात कळेल; पण दोन्ही लष्करप्रमुखांच्या भेटीने पाकिस्तानच्या बुडाला आग लागली आहे.

– विश्वास चरणकर

Back to top button