बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
उच्च प्राथमिक विभागासाठी राज्यात 15 हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या आठवडाभरात सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात् सीईटीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. बी. एड.पदवीधारकांसाठी ही भरती असेल. नियोजित वेळापत्रकानुसार ही भरती लवकर झाली तर 2022-23 या शैक्षणिक वर्षात कार्यरत असलेल्या शिक्षकांवरील ताण कमी होणार आहे. कोरोना, आर्थिक चणचण अशा अनेक कारणांमुळे 2018 नंतर शिक्षक भरतीसाठी आवश्यक सीईटी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील रिक्त पदांची संख्या तब्बल 15 हजारांवर पोचली आहे. त्यामुळेच शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे.
शिक्षणमंत्री बी.सी. नागेश याबबात म्हणाले, भरती प्रक्रिया प्रशासनाने लवकर पूर्ण केल्यास 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षकांची कमतरता भासणार नाही. शिक्षक भरतीसाठी उमेदवारांने बीएड पूर्ण केलेले असावे. सीईटीमध्ये जास्तीत जास्त गुण, गुणवत्ता आणि आरक्षणाच्या आधारावर भरती केली जाणार आहे. सात जिल्ह्यांमध्ये यापूर्वी 5000 शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शैक्षणिक दर्जा सुधारण्याकरिता सीईटी, टीईटी पास झाल्यानंतर थेट नियुक्ती केली जाणार आहे.
राज्यात शिक्षक भरतीला चालना मिळाली आहे. मात्र विषय शिक्षकांची भरती होत असल्याने केवळ बी. एड, धारकांनाच शिक्षक होण्याची संधी मिळाली आहे. पहिली ते पाचवीपर्यंत रिक्त झालेल्या शिक्षकांच्या जागांवर डी. एड. धारकांची नेमणूक करण्यात येते. मात्र ही भरती तूर्त तरी होणार नाही. त्यामुळे यावेळीही डीएडधारकांवर अन्याय होणार आहे. पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षक भरती करण्यासाठीही सीईटी लवकर घ्यावी, अशी मागणी डीएडधारक करु लागले आहेत.
हेही वाचलत का ?