इगतपुरी/घोटी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील वैतरणा डॅमजवळील शेताजवळ मुजाहिद उर्फ गोल्डी अफजल खान (23, रा. भारतनगर, वडाळा रोड, नाशिक) याचा दि. 26 एप्रिल रोजी अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. तथापि पोलिसांनी या खुनाचा (Murder )छडा लावला असून, तीनही संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अद्याप एक संशयित फरार आहे. याप्रकरणात रामेश्वर उर्फ राम मोतीराम गर्दे (30, रा. स्नेह संकुल, अशोका मार्ग, नाशिक), सलमान उर्फ माम्या वजीर खान (रा. वडाळागाव, नाशिक), सदाशिव उर्फ शिव पाराजी गायकवाड (रा. वडाळा गाव, म्हाडा कॉलनी, नाशिक) या तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केले असता, तिघांना 9 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. (Murder)
तिघे संशयित आणखी एका साथीदारासह स्कोडा सुपर्ब कार (क्र. एमएच 06 एव्ही 3344) या वाहनातून बसवून मुंबई-आग्रा महामार्गावर मुंढेगाव शिवारात घेऊन गेले होते. तेथे त्यांचे आपसात वाद झाल्याने यातील संशयितांनी मुजाहिद याचा धारदार चाकूने वार करून खून केला व मृतदेह वैतरणा धरणाच्या बॅकवॉटर परिसरात फेकला. तिथेच मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला, अशी कबुली दिल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. गुन्ह्यात आरोपींनी वापरलेली स्कोडा सुपर्ब कार जप्त करण्यात आली असून, फरार संशयिताचा शोध सुरू असल्याचे पोलिस म्हणाले.
संशयित सराईत गुन्हेगार
संशयित आरोपी नाशिक शहरातील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, जबरी दुखापत, जबरी चोरी, घरफोडी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घोटीचे सहायक निरीक्षक दिलीप खेडकर गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत. गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिस हवालदार शीतल गायकवाड, पोलिस नाईक संतोष दोंदे, योगेश यंदे आदींनी कामगिरी केली.