राजर्षींच्या अपूर्ण योजना पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली | पुढारी

राजर्षींच्या अपूर्ण योजना पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली

कोल्हापूर : सागर यादव
रयतेच्या सर्वांगीण प्रगतीच्या योजना लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी राबविल्या. राजर्षींनी दूरद‍ृष्टीने अनेक योजनांचे नियोजनही केले होते. मात्र त्यांच्या अचानक निधनाने त्या योजना अपुर्‍या राहिल्या. आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्ताने त्यांच्या अपुर्‍या योजना पूर्ण करण्याचा निर्धार करून यासाठीची कृती करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.

बँका, पतपेढ्या सक्षम व्हाव्यात

व्यापार उद्योगात रयतेची सर्वांगीण प्रगती व्हावी या उद्देशाने शाहू महाराज यांनी व्यापारी, शेतकरी आणि कष्टकरी जनतेला सहजपणे कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी विविध पतपेढ्या-बँका निर्माण केल्या. मात्र आज काही बँका-पतपेढ्या बंद पडल्याचे दिसत आहे किंवा अडचणीतून वाटचाल करत आहेत. त्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.

रेशीम, चहा-कॉफी निर्मितीचे प्रयत्न

पारंपरिक शेतीबरोबरच नवनवीन प्रयोगांवर राजर्षी शाहूंचा भर होता. रेशीम उद्योगवाढीसाठी जोतिबा डोंगरावर गायमुख परिसरात तुतूची लागवड करून तिथे रेशीम उद्योग वाढावा यासाठी जपानवरून तज्ज्ञ व्यक्‍ती बोलावली होती. याशिवाय पन्हाळा परिसरात चहा-कॉफी निर्मितीसाठीही प्रयत्न केले होते. मात्र आज या गोष्टींचे कोणत्याही प्रकारचे अस्तित्व नसल्याचे वास्तव आहे.

पर्यावरण अन् वन्य जीवांचाही विचार

राजर्षी शाहू महाराज यांनी पर्यावरण आणि वन्य जीवांच्या संरक्षणाचा विचार आवर्जून केला होता. पडसाळी भागात हत्तींसाठी स्वतंत्र जंगल केले होते. कोल्हापुरातील सर्व रस्त्यांची निर्मिती करताना रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्यासाठी उपाययोजना केली होती. या रस्त्यांवरून प्रवास करताना लोकांना उन्हाचा त्रास होऊ नये, अशी महाराजांची इच्छा होती. जंगली प्राण्यांसाठी अरण्ये व पार्क निर्माण केले होते. हुपरी पार्क, रेंदाळ पार्क, चिपरी पार्क अशा अनेक पार्कचा यात समावेश होता. पण यापैकी एकही पार्क आज अस्तित्वात नसल्याचे वास्तव आहे. कात्यायनी येथे बोटॅनिकल गार्डन करून दरवर्षी येथे देशी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जायची. पण आज या परिसरात केवळ फार्म हाऊस आणि प्लॉटिंग सुरू आहे.

पुण्यात कुस्ती हब, रेल्वे कोकणाला जोडणे

खासबाग कुस्ती मैदानापेक्षाही मोठे मैदान पुण्यात बांधून तेथे कुस्ती हब करण्याची राजर्षी शाहू महाराज यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी जागेचा शोधही घेतला होता. कोल्हापूर -राधानगरीमार्गे रेल्वे कोकणाला जोडण्याची इच्छा होती. याबाबतच्या नोंदी ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आहेत. आज या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याचे वास्तव आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दूरद‍ृष्टीने राबविलेल्या मात्र त्यांच्या निधनामुळे अपुर्‍या राहिलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी राज्यकर्ते व प्रशासनाकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे.
-राम यादव, इतिहास अभ्यासक

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विविध पैलूंवर बारकाईने अभ्यास होणे अत्यावश्यक आहे. हजारो कागदपत्रे, आदेश यातून त्यांच्या लोककल्याणकारी राजवटीचा मागोवा घेऊन भविष्यातील योजनांसाठी प्रयत्न व्हावा.

– गणेशकुमार खोडके, पुराभिलेखाधिकारी 

Back to top button