सातारा : 19 वर्षांनंतर कारखान्यात सत्तांतर ; किसन वीर आबांचाच | पुढारी

सातारा : 19 वर्षांनंतर कारखान्यात सत्तांतर ; किसन वीर आबांचाच

सातारा / वाई; पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून लागून राहिलेल्या भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आ. मकरंदआबा पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी बचाव पॅनेलने तब्बल 19 वर्षांनंतर सत्तांतर घडवून विरोधकांचा 21-0 ने सफाया केला. या निवडणुकीत शेतकरी बचाव पॅनेलच्या उमेदवारांनी 9 हजार 500 मतांचे भरभक्कम मताधिक्य घेऊन दिग्विजय संपादित केला. मदनदादा भोसले यांच्या ताब्यात असलेले एकमेव सत्तास्थानही खालसा करून किसन वीर कारखाना ‘आबां’चाच असल्याचे मतदारांनी मतपेटीतून सिद्ध केले.

आ. मकरंद पाटील यांनी किसन वीर कारखान्याची निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे यंदा मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले. अर्ज माघारीनंतर 21 जागांसाठी दोन्ही गटांचे 46 उमेदवार रिंगणात राहिले होते. कारखान्यासाठी मंगळवारी तब्बल 69.31 टक्के मतदान झाले होते. यंदा प्रथमच मतदानाचा टक्का वाढल्याने कारखान्यात सत्तांतर होणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता.

निवडणूक कार्यक्रमानुसार गुरुवार, दि. 5 रोजी सकाळी 8.30 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मतपेट्या उघडल्यानंतर प्रत्येक मतदारसंघनिहाय असलेल्या वेगवेगळ्या मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्यात आले. वर्गीकरण झाल्यानंतर प्रत्यक्षात मतमोजणीस सुरूवात झाली. त्यानंतर पहिल्या फेरीत कोण आघाडीवर कोण पिछाडीवर याची आकडेवारी समोर येऊ लागली. हळूहळू सर्वच मतदारसंघांतील आकडे समोर आल्यानंतर शेतकरी बचाव पॅनेलच बाजी मारणार हे जवळपास निश्चित झाले होते.

सोसायटी मतदार संघात शेतकरी बचाव पॅनेलचे अध्यक्ष व सर्वेसर्वा आ. मकरंद पाटील विरुद्ध काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांचे वडील रतनसिंह शिंदे यांच्यात लढत झाली. यामध्ये आ. पाटील यांना 238 तर शिंदे यांना 91 मते मिळाली. या मतदारसंघात आ. पाटील यांनी 147 मतांनी विजय मिळवला.

जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या भुईंज ऊस उत्पादक गटात किसन वीरचे चेअरमन व शेतकरी विकास पॅनेलचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांचा धक्कादायक पराभव झाला. त्यांना 12 हजार 970 एवढी मते मिळाली. या गटात शेतकरी बचाव पॅनेलच्या प्रकाश धुरगुडे यांनी 21 हजार 669, रामदास इथापे यांनी 21 हजार 568, प्रमोद शिंदे यांनी 21 हजार 507 मते मिळवत विजय मिळवला.

कवठे ऊस उत्पादक गटात आ. मकरंद पाटील यांचे बंधू आणि जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील यांनी 22 हजार 244 मते मिळवत विजय मिळवला. त्यांच्याच पॅनेलमधील रामदास गाढवे यांना 22 हजार 155 आणि किरण काळोखे यांना 21 हजार 716 मते मिळाली.

बावधन ऊस उत्पादक गटात शेतकरी बचाव पॅनेलचे शशिकांत पिसाळ यांनी 22 हजार 58, दिलीप पिसाळ यांनी 22 हजार 359 व हिंदुराव तरडे यांनी 21 हजार 469 मते मिळवत विजय साकारला.

सातारा तालुका ऊस उत्पादक गटात शेतकरी बचावच्या संदीप चव्हाण यांनी 22 हजार 110, बाबासाहेब कदम यांनी 21 हजार 833 आणि सचिन जाधव यांनी 22 हजार 36 मते मिळवत विजय मिळवला.

कोरेगाव तालुका ऊस उत्पादक गटामध्ये शेतकरी बचाव पॅनेलचे ललित मुळीक यांना 21 हजार 567, संजय फाळके यांना 21 हजार 673, सचिन साळुंखे यांना 21 हजार 532 मते मिळाली.

महिला राखीव गटामध्ये सुशीला जाधव यांनी 22 हजार 394 आणि सरला वीर यांनी 21 हजार 562 मते मिळवत विरोधी विजया साबळे आणि आशा फाळके यांचा पराभव केला. ओबीसी गटामध्ये शिवाजी जमदाडे यांनी 22 हजार 610 मते मिळवत विरोधी उमेदवार आनंदा जमदाडे यांना पराभूत केले. विमुक्त भटक्या जाती व जमाती मतदारसंघांमध्ये शेतकरी बचाव पॅनेलचे हणमंत चवरे यांनी 22 हजार 661 मते मिळवत चंद्रकांत काळे यांचा पराभव केला. अनुसूचित जाती-जमाती मतदार संघांमध्ये संजय कांबळे यांनी 22 हजार 724 मते मिळवत चंद्रकांत कांबळे यांचा पराभव केला.

अंतिम मतमोजणी झाली तेव्हा अनेक उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना 9 हजार 500 पेक्षा जास्त मतांच्या फरकांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवले. मदनदादा भोसले यांच्या पॅनेलचा दारूण पराभव झाला. मदनदादा भोसले यांना शिवसेनेचे आ. महेश शिंदे यांनीही मदत केली होती. या पराभवाने आ. महेश शिंदे यांनाही धक्का बसला आहे.

मतमोजणी केंद्रातील आकडेवारी जशी बाहेर पडू लागली तशी मतमोजणी केंद्राबाहेर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. पहिल्या फेरीतच शेतकरी बचाव पॅनेलच्या सर्वच्या सर्व 21 उमेदवारांनी शेतकरी विकास पॅनेलच्या उमेदवारांवर विरोधात जवळपास दोन ते चार हजार मतांचे लीड घेतले होते. त्यामुळे शेतकरी बचाव पॅनेलच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष तर शेतकरी विकास पॅनेलच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले होते. सायंकाळी पाचनंतर दुसर्‍या फेरीचे ही निकाल बाहेर येऊ लागले. यामध्ये ही आघाडी वाढून 9 हजार 500 च्या पुढे गेली होती. मतमोजणी झाल्यानंतर आ. मकरंद पाटील गटांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली. याचवेळी डॉल्बीच्या दणदणाटामध्ये कार्यकर्ते बेधुंद होऊन नाचत होते.

किसन वीरच्या निवडणुकीतील विजय हा 52 हजार सभासदांचा आहे. गेली 17-18 वर्षे सत्तारूढ मंडळींनी चुकीच्या पद्धतीने कामकाज केले. भ्रष्टाचार केला, देणी दिली नाहीत. उलट कारखान्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवला. किसन वीर आबा यांनी स्थापन केलेले आणि शेतकर्‍यांचे वैभव असलेले सहकार मंदिर रसातळाला गेले. त्यामुळेच कारखान्यात सत्तांतर घडले.
– आ. मकरंद पाटील

Back to top button