नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नाशिक, जळगावचा समावेश असलेल्या मध्य रेल्वेने कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर 458 मेल/एक्स्प्रेस आणि 131 पॅसेंजर, मेमू, डेमू अशा 589 रेल्वेगाड्या पूर्ववत करण्यात आल्या आहेत. मालवाहतुकीमध्ये मध्य रेल्वेने 2021-22 या वर्षात 76.55 दशलक्ष टन सर्वोत्तम लोडिंग गाठले आहे. तर यंदाच्या वर्षी त्यात 23 टक्के वाढ झाली आहे. नागपूर विभागात आठ आणि भुसावळ विभागात 13 एस्केलेटर बसविण्यात आले असून, भुसावळ विभागात आठ आणि नागपूर विभागात दोन अतिरिक्त एस्केलेटर मंजूर करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी दिली.
मध्य रेल्वेच्या भुसावळ व नागपूर विभागाच्या कामासंदर्भात चर्चेसाठी नागपूर येथे बैठकीत ते बोलत होते. रेल्वे प्रवाशांच्या सुविधा आणि बोर्डावरील प्रस्तावित कामांवर त्यांनी विविध जिल्ह्यांतील खासदारांशी चर्चा केली. रेल्वेच्या विकासाचा रोडमॅप तयार करण्यात खासदारांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. भुसावळ विभागातील जळगाव-भादली या भागावर तिसरी लाइन सुरू करण्यात आली आहे. तसेच अमरावती-नरखेड लाइनला इटारसी-नागपूर लाइनशी जोडणार्या नरखेड कॉर्ड लाइनचे कामही पूर्ण झाले असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांनी मालेगाव रोडवरील रेल्वे फाटक क्र. 22 येथे आरओबी बांधून धुळे ते मुंबई 18 डब्यांची ट्रेन सुरू करण्याची, तर खासदार डॉ. विकास महात्मे यांनी नागपूर-भुसावळ इंटरसिटी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्याची सूचना केली. खासदार रामदास तडस यांनी सिंदी, तुळजापूर, वरुड, मोर्शी रेल्वेस्थानकांवर कोविड-19 पूर्वी मंजूर झालेल्या मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे जलदगतीने पूर्ववत करण्याची सूचना केली आहे. खासदार कृपाल तुमाने यांनी कोविडनंतर नरखेड स्टेशनवर गाड्या थांबवाव्यात, या स्थानकाला मॉडेल स्टेशन म्हणून विकसित करावे, अशी मागणी केली आहे. खासदार दुर्गादास उईके यांनी स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 ची लांबी वाढवण्याची, स्थानकावर इलेक्ट्रॉनिक कोच इंडिकेटर बोर्ड बसवण्याची सूचना केली.