लॅपटॉप आणि आरोग्य डे | पुढारी

लॅपटॉप आणि आरोग्य डे

स्कटॉपऐवजी लॅपटॉपवर बराच काळ काम करणं हे शारीरिक आणि मानसिक द़ृष्टीने नुकसानदायक ठरू शकते. लॅपटॉपमध्ये स्क्रीन आणि की-बोर्ड खूप जवळ असतात. यावर काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. लॅपटॉपवर काम करताना हाताला पुरेशी विश्रांती मिळत नाही. लॅपटॉपवर सतत टाईप केल्याने बोटांमध्ये रेपीटेटीव्ह स्ट्रेन इंज्युरी (आरएसआय) होते. ज्याला ‘कार्पल टनल सिंड्रोम’ असेही म्हणतात. यात बोटांमध्ये वेदना होणे, थरथरणे, किंवा बोटे सुन्न होणे, बोटांमध्ये कमजोरी येणे, एखादी वस्तू पकडताना त्रास होणे, मोटर स्कील, लिहिताना त्रास होणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते.

अलीकडील काळात ऑफिसमधून घरी परतल्यानंतरही लॅपटॉपवर काम करणार्‍या अनेक व्यक्ती आज घरोघरी दिसत आहेत. डेस्कटॉपच्या तुलनेत कामाच्या द़ृष्टीने लॅपटॉपचे फायदे अनेक आहेत. जागा कमी व्यापणे, कुठेही घेऊन जाता येणे, कुठेही बसून काम करता येणे या जमेच्या बाजू असल्यामुळे लॅपटॉपचे वेड वाढत आहे; परंतु लॅपटॉपमुळे काही आजारांनाही निमंत्रण मिळत आहे, याकडे दुर्लक्ष होत आहे. लॅपटॉपचे की-बोर्ड खूप लहान असतात. त्यामुळे त्याच्यावर बोटं व्यवस्थित ठेवता येत नाहीत. त्यामुळे बोटांबरोबर मनगटालाही चांगलाच ताण येतो. हा ताण मनगटापासून पाठीपर्यंत आणि पाठीपासून मानेपर्यंत पोहोचतो आणि त्याचा खूपच त्रास होतो.

लॅपटॉपवर काम करताना मानेला थोडे वाकून काम करावे लागते. त्यामुळे मानदुखी, मान आखडणे, मानेवर ताण येणे, स्पॉनडोलायटिस सारख्या समस्या निर्माण होतात. डोळ्यावर जास्त ताण पडतो. तसेच डोळ्यांची जळजळ, डोळ्यांना खाज सुटणे, पाणी येणे, डोळे थकून जाणे, रंग ओळखता न येणे इत्यादी समस्या जाणवतात. यालाच कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणतात. लॅपटॉपवर काम करताना चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे मान, पाठीचा कणा आणि कंबरेमध्ये वेदना होण्याची समस्या निर्माण होते. सर्व्हायकल स्पाँडिलिसिस पण होऊ शकतो. प्रवास करताना लॅपटॉप बॅग पाठीवर लटकवून ठेवली तरी त्यामुळे मान, हात, कंबरेच्या स्नायूंमध्ये वेदना होतात आणि ताणही निर्माण होतो. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते लॅपटॉपवर सतत काम केल्याने अनेक मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. डोकेदुखी, हृदयाची गती वाढणे, झोप न लागणे, राग येणे, सुस्ती येणे, ताण आणि आळस येणे इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात.

जे लोक बराच काळ लॅपटॉप आपल्या मांडीवर ठेवून काम करतात त्यांच्यामध्ये प्रजननासंबंधी समस्या निर्माण होऊ शकते. लॅपटॉप चालू असताना त्यातून निघणारी उष्णता आणि चुंबकीय किरणांमुळे स्त्री-पुरुषांमध्ये वंध्यत्व निर्माण होऊ शकते, असे काही पाहण्यांमधून दिसून आले आहे. याखेरीज लॅपटॉप मांडीवर घेऊन तासन्तास काम करणार्‍यांच्या डोळ्यांवर अतिशय वाईट परिणाम होऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर लॅपटॉपचा वापर करताना म्हणूनच अतिशय काळजी घेणे आवश्यक आहे. लॅपटॉपला मांडीवर ठेवून काम करू नका. लॅपटॉप टेबलवर किंवा कठीण पृष्ठभागावर ठेवून काम करा. स्क्रीन चुकीच्या कोनात ठेवून काम करू नका, स्क्रीन डोळ्यांच्या समोर ठेवा. स्क्रीन साईज छोटा असल्याने टेक्स साईज मोठा ठेवून काम करा. म्हणजे डोळ्यांवर ताण येणार नाही. लॅपटॉपवर बराच काळ डोळे गाडून काम करू नका. अधूनमधून डोळ्यांची हालचाल करा. विश्रांती घ्या. कोणतेही आधुनिक गॅजेट हे फायदेशीर असले तरी त्याचे तोटेही बरेच असतात. ते लक्षात घेऊनच त्याचा वापर केला तरच ते फायदेशीर ठरू शकते; अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.

– डॉ. संतोष काळे

Back to top button