वाट खडतर! | पुढारी

वाट खडतर!

पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांच्या भाजप प्रवेशामुळे गुजरातमधील राजकारण ढवळून निघाले आहे. सौराष्ट्रातील 54 जागांवर पाटीदारांची भूमिका निर्णायक राहिली आहे. त्यामुळे हार्दिक यांच्या भाजपागमनाकडे औत्सुक्याने पाहिले जात आहे. तथापि, खुद्द भाजपातील अनेकांची त्यांच्या पक्षप्रवेशावर नाराजी आहे. त्यामुळे त्यांचा विरोध पत्करून पक्षात आपले स्थान तयार करणे हे मोठे आव्हान हार्दिक यांच्यापुढे आहे.

गुजरातचे पाटीदार समाजाचे तरुण नेते हार्दिक पटेल यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसबरोबर हार्दिक यांची इनिंग फार काळ चालली नाही. हार्दिक यांनी 2019 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि 2020 मध्ये त्यांना राज्याचे कार्यकारी अध्यक्ष देखील केले. परंतु, अन्याय होत असल्याचा आरोप करत त्यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचा राजीनामा दिला. हार्दिक पटेल यांनी भाजपचे कमळ हाती घेतले असले, तरी या पक्षात त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. गेल्या सात वर्षांत ते गुजरातमध्ये भाजपच्या विरोधात मैदानात उतरले होते. हार्दिक यांनी नरेंद्र मोदी यांना भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान म्हटले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिपाई म्हणून काम करणार असल्याचे सांगितले आहे.

हार्दिक आता भाजपचे नेते झाले असले, तरी त्यांच्यासमोरील आव्हाने कमी नाहीत. गुजरातमधील पाटीदार आंदोलनाच्या काळात आणि काँग्रेस सदस्यत्व स्वीकारल्यानंतर हार्दिक पटेल यांनी भाजपवर शाब्दिक हल्ले केले होते. अमित शहा यांना त्यांनी ‘डायर’ची उपमा दिली. त्यांनी 12 कोटींचे आमिष दाखविल्याचादेखील आरोप केला होता. भाजपच्या अनेक नेत्यांच्या कार्यक्रमात हार्दिक पटेल यांच्या समर्थकांनी अडथळे आणले. त्यामुळे भाजपच्या प्रवेशावेळी एका गटाकडून सातत्याने विरोध केला गेला. भाजपचा एक गट हार्दिक यांच्या भाजपविरोधी भूमिकेवरून नाराज आहे. त्यामुळे त्यांनी पक्षात प्रवेश देण्यास विरोधही केला होता. या गटाच्या मते, हार्दिक यांनी भाजपचे बरेच नुकसान केले आहे. आता काँग्रेसमधील स्वत:ची अधोगती पाहता ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या मते, यापूर्वीदेखील काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसमधून येणार्‍यांबद्दल आम्हाला कोणताही आक्षेप नाही. परंतु, हार्दिक यांनी भाजपचे खूप नुकसान केलेे. म्हणून राज्यातील बहुतांश मोठे नेते हार्दिक यांना पक्षात घेण्याबाबत नाखूश आहेत.

काँग्रेसला आणखी झटका देणार

हार्दिक यांनी काँग्रेसमध्ये नाराज असणार्‍या अन्य नेत्यांना भाजपमध्ये आणण्याचे संकेत दिले. त्यांनी म्हटले की, आपण आयुष्यातील नवीन अध्यायाला सुरुवात केली आहे. दर दहा दिवसाला कार्यक्रम आयोजित करू आणि त्यात काँग्रेसमधील नाराज लोकांना आणू. हार्दिक यांच्या वक्‍तव्यावरून एक बाब स्पष्ट झाली की, आगामी काळात ते काँग्रेसला धक्का देऊ शकतात.

पाटीदार नेत्यांचादेखील हार्दिक यांना विरोध

गुजरात भाजपमध्ये अनेक पाटीदार नेते आहेत आणि त्यांना हार्दिक पटेल यांचा प्रवेश पचनी पडलेला नाही. भाजपचे पाटीदार नेते वरुण पटेल यांनी म्हटले, की हार्दिक यांच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी घाम गाळला आहे. ही लढाई केवळ भाजप आणि काँग्रेस यांच्यापुरती नाही, तर या काळात अनेक व्यक्‍तिगत हल्लेदेखील केले गेले. हार्दिक यांच्या काँग्रेस प्रवेशाचा पक्षाला फारसा फायदा झाला नव्हता. अशावेळी हार्दिकमुळे भाजपला देखील लाभ होणार नाही.

ट्यूनिंग बसविणे कठीण

भाजपमधील पाटीदार नेत्यांना हार्दिक पटेल यांचा प्रवेश भावलेला दिसून येत नही. त्यामुळे त्यांच्या समवेत ट्यूनिंग बसविणे हार्दिक यांना कठीण जाणार आहे. सोशल मीडियावर हार्दिक यांचे जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओत ते भाजपवर प्रखर शाब्दिक हल्ले करताना दिसतात. भाजपसमोर आपण कधीही झुकणार नाही. भाजपला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचे हार्दिक यांचे वक्‍तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना हार्दिक यांची दमछाक होणार आहे.

हार्दिक यांचा कस लागणार?

हार्दिक यांच्या प्रवेशानंतर भाजपच्या एका नेत्याने म्हटले की, हार्दिक पटेल यांना लगेच काही मानाचे पान नसेल. पक्षाचे सदस्य म्हणून त्यांच्या शिस्तीचे आकलन केले जाईल आणि त्यांना आपली पात्रता सिद्ध करून दाखवावी लागणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्‍ते शक्‍तिसिंह गोहिल यांनी म्हटले की, हार्दिक पटेल हे सहा महिन्यांपासून भाजप नेत्यांच्या संपर्कात होते. त्यांचा भाजपमधील प्रवेश हा एक संधीसाधूपणा आहे. ही गोष्ट गुजरातच्या लोकांना चांगलीच ठावूक आहे. हार्दिक पटेल आता केवळ टिव्हीवरचे वाघ राहिले आहेत.
तज्ज्ञ मंडळी काय म्हणतात?

आरक्षणाच्या आंदोलनात हार्दिक पटेल यांच्यासमवेत राहिलेले लालजी पटेल यांनी हार्दिक यांचा भाजप प्रवेश हा चुकीचा निर्णय असल्याचे म्हटले आहे. हार्दिक यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून चूक केली होती आणि तीच चुक पुन्हा केली, असे ते म्हणतात. कारण, आरक्षण आंदोलनादरम्यान त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे त्यांना राजकारणात आरक्षण आंदोलनाप्रमाणे यश मिळणार नाही. दुसरीकडे ‘व्होटर्स मूड रिसर्च’चे सीईओ जय मृग म्हणाले की, भाजप प्रवेशाने हार्दिक पटेल हे आता प्रत्यक्षात राजकारणाच्या मैदानात उतरले आहेत. त्यांची राजकीय इनिंग सुरू झाली आहे.

भाजपसाठी कसे आहेत उपयुक्‍त? गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीत पाटीदार
समुदायाची मोठी भूमिका असेल. सौराष्ट्राच्या 54 जागांवर पाटीदारांची भूमिका निर्णायक राहिली आहे. 2012 च्या निवडणुकीत काँग्रेसने सौराष्ट्रात 12, तर 2017 मध्ये 30 जागा जिंकल्या होंत्या. 2017 मध्ये भाजपला केवळ 24 जागा मिळाल्या. यंदा भाजप काँग्रेसला जोरदार टक्‍कर देण्यासाठी सौराष्ट्रात संपूर्ण ताकद लावणार आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे पाटीदार समुदायाच्या कार्यक्रमात सातत्याने सहभागी होत आहेत. अशावेळी हार्दिक पटेल यांचा प्रवेश उपयुक्‍त ठरू शकतो. त्याच्या मदतीने भाजप पाटीदारांवर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करू
शकतो.

– सत्यजित दुर्वेकर

Back to top button