कोरोना रुग्ण संख्येत हळूहळू वाढ; मात्र काळजी नाही | पुढारी

कोरोना रुग्ण संख्येत हळूहळू वाढ; मात्र काळजी नाही

मिलिंद कांबळे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. दहाच्या आत असलेला दैनंदिन पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा आता 30 च्या पुढे जात आहे. रूग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने सध्या सर्वच रूग्ण होम क्वारंटाइन राहून बरे होत आहेत. मात्र, खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा. हात वारंवार स्वच्छ करावेत, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

शहरात पूर्वी 800 ते 1 हजार नागरिकांची चाचणी केल्यानंतर दहाच्या आत रूग्ण आढळून येत होते. मागील दोन महिन्यांच्या आकडेवारीच्या तुलनेत जून महिन्यात रूग्ण संख्येत तिप्पटीने वाढ झाली आहे. दररोज 300 ते 500 नागरिकांची तपासणी केली जात असून, त्यात 30 रूग्ण आढळून येत आहेत. त्यात महिलांच्या तुलनेत पुरूष रूग्णांची संख्या अधिक आहे.

कोल्हापूर : पुरात ज्यांची जनावरे वाहून जातील, त्यांच्यावरच होणार कारवाई

रूग्णांमध्ये सर्दी, खोकला, अंगदुखी, अशक्तपणा, ताप अशी सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे बहुतांश रूग्ण होम क्वारंटाइनमध्ये राहून सात दिवसांत बरे होत आहेत. गेल्या दोन महिन्यात एकही रूग्ण रूग्णालयात दाखल झालेला नाही. तसेच, एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही, ही शहरवासीयांसाठी दिलासादायक बाब आहे.

मात्र, खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी कोरोना नियमाचे पालन करण्याची गरज असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

शहरात नाहीत मंकीपॉक्स, ओमायक्रॉनचे रूग्ण

दक्षिण ऑफ्रीकेतील सुरू झालेला ओमायक्रॉन आजाराचे रूग्ण तिसर्या लाटेत शहरात आढळून येत होते. अशा कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडून तपासणी करून घेतली जात होती. मात्र, सध्या असे रूग्ण आढळत नसल्याने तपासणी करून घेण्यात येत नाही. तसेच, शहरात मंकीपॉक्स आजाराचे अद्याप एकही रूग्ण आढळून आलेला नाही. त्यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार ठेवण्यात आला आहे.

निवडणूक दिल्ली-मुंबईची; बोलबाला कोल्हापूरचा

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा

पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या रूग्णांची थोडी संख्या वाढली आहे. त्या दृष्टीने तसेच, शासनाच्या सुचनेवरून थेरगाव, आकुर्डी, भोसरी व जिजामाता रूग्णालय तयार ठेवले आहे. नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन केले पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा. हात वारंवार धुवावेत. स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. लस घेतली नसल्यास ती प्राध्यानाने घ्यावी. सध्याच्या रूग्णांमध्ये गंभीर लक्षणे नाहीत. सौम्य लक्षणे असल्याने ते होम क्वारंटाइन होऊन उपचार घेत आहेत, असे महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

दिनांक       रुग्ण पॉझिटीव्ह            रुग्ण सक्रिय
3 जून                 9                            68
4 जून                27                           89
5 जून                18                           98
6 जून                19                         105
7 जून                 31                        128
8 जून                35                          154

वाट खडतर!

कोरोनाची सद्यस्थिती

रूग्ण -3 लाख 59 हजार 935
बरे झालेले रूग्ण- 3 लाख 55 हजार 888
दगावले रूग्ण- 4 हजार 624
डोस- 36 लाख 12 हजार 56
चाचण्या-29 लाख 52 हजार 227

Back to top button