

नाशिक : सतीश डोंगरे
राज्यातील विविध विद्यापीठांच्या परीक्षा काही आठवड्यांवर येऊन ठेपल्या असल्या, तरी परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम कायम आहे. सुरुवातीला परीक्षा ऑनलाइन होणार की, ऑफलाइन या विषयावर बर्याच चर्चा झाल्या. हा विषय चर्चेपुरताच मर्यादित राहिला नाही, तर उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. अखेर परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार, हा फॉर्म्यूला निश्चित झाला. मात्र, परीक्षांच्या अनुषंगाने उपस्थित झालेले प्रश्न अजूनही अनुत्तरितच असल्याने, विद्यार्थ्यांमधील संभ्रम कायम आहे. कोरोना महामारीमुळे सलग दोन वर्षे विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. वस्तुनिष्ठ प्रश्नांचा पर्याय उपलब्ध करून दिल्याने, अनेक विद्यार्थ्यांना गुणांची लयलूट करण्याची लॉटरीच लागली.
मात्र, त्यामुळे त्यांच्या लिखाणाच्या सरावावर परिणाम झाला, हेही नाकारता येत नाही. अशात ऑफलाइन परीक्षांची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्याने, अनेकांनी धास्ती घेतली. त्यातून, विद्यापीठांनी हेही सत्र ऑनलाइन पद्धतीनेच घ्यावे, अशी विद्यार्थ्यांनी एकमुखी मागणी केली. विद्यार्थी संघटनांनी एकजूट होऊन कुलगुरूंची भेट घेत ऑनलाइन परीक्षेचा आग्रह धरला. अनेकांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना गाठून ऑनलाइन परीक्षेची मागणी केली. हा तिढा वाढू लागल्याने, एका विद्यार्थ्याने थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत, परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन? याचा निर्वाळा करण्याबाबतची याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करताना, राज्यातील सर्व विद्यापीठांच्या उन्हाळी परीक्षांचा एकच फॉर्म्यूला असावा, याबाबतचा निकाल दिला होता. त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व कुलगुरूंच्या बैठकीत ऑफलाइन परीक्षा पद्धतीवर एकमत झाले. मात्र, परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ असेल की, दीर्घोत्तरी?, परीक्षेसाठी कालावधी वाढवून दिला जाणार काय?, परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमावर आधारित असणार काय?, पेपरमध्ये एक दिवसाचा खंड असेल काय? असे एक ना अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित असल्याने, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.
कारण सद्यस्थितीविद्यापीठांकडून 100 टक्के अभ्यासक्रमांवर दीर्घोत्तरी पद्धतीने परीक्षा घेतली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे, तर काही विद्यापीठ वस्तुनिष्ठ पद्धतीने निम्म्याच अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घेणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था असून, अभ्यासापेक्षा विद्यापीठांच्या बदलणार्या भूमिकांकडेच विद्यार्थी लक्ष देऊन असल्याची वस्तुस्थिती आहे. सध्या मुंबई विद्यापीठासह राज्यांतील इतर विद्यापीठांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. पुणे विद्यापीठाची उन्हाळी परीक्षादेखील जून महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होणार आहेत. अशात विद्यापीठांनी परीक्षांबाबतचे धोरण निश्चित करणे गरजेचे आहे. विद्यापीठांकडून बर्याचशा बाबी स्पष्ट नसल्याने, महाविद्यालयीन स्तरावरदेखील अनभिज्ञता आहे. प्राध्यापक किंवा इतर शिक्षकेतर कर्मचार्यांकडे परीक्षांबाबतची पुरेशी व इत्थंभूत माहिती नसल्याने, तेही विद्यार्थ्यांना समाधानकारक माहिती देऊ शकत नाहीत. अशात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था असून, कमी काळात परीक्षांची तयारी करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बहुतांश महाविद्यालयांनी अभ्यासक्रम अजूनही पूर्ण केलेले नाहीत. जर 100 टक्के अभ्यासक्रमावर प्रश्नप्रत्रिका दिली गेली, तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्राध्यापकांकडून सध्या एक्स्ट्रा लेक्चर्सचा धडाका सुरू आहे. मात्र, त्यामुळे विद्यार्थ्यांना पुरेसे आकलन होत आहे काय? हा प्रश्नच आहे. कोरोना कालावधीत ऑनलाइन अध्यापन आणि अध्ययनामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. अशात विद्यार्थी उन्हाळी सत्र परीक्षांना सामोरे जाणार असल्याने, अर्थातच गुणवत्तेवर परिणाम होणे स्वाभाविक आहे. अशात विद्यापीठांच्या काय भूमिका असतील, याकडे तमाम विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.