Avinash Jadhav : राज ठाकरेंच्या जागी ‘या’ मनसे नेत्याची थेट अयोध्येत धडक! | पुढारी

Avinash Jadhav : राज ठाकरेंच्या जागी ‘या’ मनसे नेत्याची थेट अयोध्येत धडक!

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) ठाण्यातील नेते अविनाश जाधव हे आपल्या काही कार्यकर्त्यांसह अयोध्येत दाखल झाले आहेत. रविवारी त्यांनी रामलल्लाचे दर्शनही घेतले. यानंतर अविनाश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करत मराठी माणसाला आव्हान द्यायचे नाही असा थेट इशारा दिला आहे.

आम्हाला कोणीही अडवू शकत नाही. आम्ही ठरवल्यावर कोणत्याही परिस्थितीत ती गोष्ट पूर्ण करतोच. काहीवेळापूर्वीच आम्ही रामलल्लाचे दर्शन घेतले. तसेच बृजभूषण सिंह यांचा कार्यक्रम होत असलेल्या ठिकाणीही आम्ही गेलो होतो. कोणीही मराठी माणसाला चँलेज करायचे नाही. आम्ही आलोय, आम्ही रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. आम्हाला धमक्या द्यायचे बंद करा. ज्यादिवशी राज ठाकरे आदेश देतील तेव्हा या सगळ्यांना यांची जागा आम्ही दाखवून देऊ, असे अविनाश जाधव यांनी अविनाश जाधव यांनी म्हटले.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज म्हणजे ५ जूनला अयोध्येला जाणार होते. पण त्यांच्या या दौऱ्याला उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी कडाडून विरोध केला. उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरे (Raj Thackeray) यांना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, असा इशारा खा. सिंह यांनी दिला होता. यानंतर राजकीय वातावरण तापले. त्यातच राज ठाकरेंची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना अयोध्या दौरा पुढे ढकलावा लागला होता. पण आता मनसे नेते अविनाश जाधव यांनी अयोध्येत धडक मारली. मनसेचे नेते आणि कार्यकर्ते अयोध्येत आल्यास आम्ही त्यांना शरयू नदीत बुडवू, असे आव्हान बृजभूषण सिंह यांनी दिले होते. मात्र, हे आव्हान स्वीकारत आता अविनाश जाधव यांनी थेट अयोध्येत धडक मारली आहे.

Back to top button