नैसर्गिक नाले ,www.pudhari.news
नैसर्गिक नाले ,www.pudhari.news

नाशिक : नैसर्गिक नाल्यातून वाहत आहेत सांडपाण्याचे पाट, आरोग्य धोक्यात

Published on

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
मखमलाबाद रोडवरील मंडलिक मळ्यातील अवधूत कॉलनीमार्गे जाणार्‍या नैसर्गिक पावसाळी नाल्यातून 15 दिवसांपासून सांडपाणी वाहत असून, स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात संबंधित मनपा अधिकार्‍यांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

मखमलाबाद रोडच्या डाव्या आणि उजव्या बाजूने अनेक वर्षांपासूनचा एक नैसर्गिक पावसाळी नाला आहे. अश्वमेधनगर, कर्णनगर, समर्थनगर, तुळजा भवानीनगर, म्हाडा कॉलनी आदी भागाकडून मंडलिक मळ्याकडे येणार्‍या या नैसर्गिक नाल्यातून पावसाळ्यात वाहणारे पाणी गोदावरी नदीपात्रात जाऊन मिसळते. पावसाचे पाणी वाहून नेणार्‍या या नाल्यातून मात्र गेल्या 15 ते 20 दिवसांपासून दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहते आहे. यामुळे नाल्यालगत राहणार्‍या रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या रहिवाशांना दिवसभर दुर्गंधी आणि रात्रीच्या सुमारास डासांचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात मनपाच्या संबंधित आरोग्य आणि भुयारी गटार योजनेच्या अधिकार्‍यांकडे अनेकदा तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचे आरके ग्लोरी, सुखसागर, शिवनेरी प्राइड, ब्राइट पाम्स आदी इमारतींमधील रहिवाशांनी सांगितले.

.. तर नाशिक क्रमांक
एकवर येईल का?
शहरात एकीकडे स्वच्छ भारत अभियान सुरू असून, याद्वारे नागरिकांना फीडबॅक फॉर्म भरण्याचे आवाहन केले जात आहे. स्वच्छ शहरांच्या यादीत नाशिकला क्रमांक एकवर आणण्यासाठी मनपा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे मात्र अधिकार्‍यांकडे तक्रारी करूनही नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडविला जात नाही. मनपा अधिकार्‍यांची अशी भूमिका असेल तर नाशिक कसे क्रमांक एकवर येईल, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
यापूर्वी सांडपाणी नाल्यात सोडल्यास मनपा प्रशासनाकडून नोटीस बजावली जायची. आता अश्वमेधनगर, कर्णनगर, समर्थनगर, तुळजा भवानीनगर, म्हाडा कॉलनी आदी भागाकडून येणार्‍या सांडपाण्याचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे मनपा प्रशासन आता का तेव्हासारखी तत्परता दाखवत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दिवसभर एसी केबिनमध्ये बसून आदेश देणार्‍या मनपा अधिकार्‍यांना आमची समस्या काय कळणार? प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन त्यांनी अनुभव घ्यावा. मनपाने तातडीने हा प्रश्न न सोडविल्यास आम्ही सर्व रहिवासी थेट मनपा आयुक्तांच्या दालनात धडक देणार आहोत.
– संतोष पालवे, स्थानिक रहिवासी, अवधूत कॉलनी

या समस्यां-बाबत मनपा अधिकार्‍यां-कडे अनेकदा पाठपुरावा केला आहे. विशेषत: अधिकारी या ठिकाणी येऊन पाहणी करून समस्या सोडविण्याचे आश्वासन देतात. परंतु, अद्यापही समस्या कायम आहेत. दोन वर्षांपासून ही समस्या आहे तशीच आहे. त्यामुळे आता महापालिका आयुक्तांनी स्वतः याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
– संदीप घडवजे, स्थानिक रहिवासी, अवधूत कॉलनी

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news