सातारा : सपोनि बधेंसह पाच पोलिस कर्मचारी निलंबित

file photo
file photo
Published on
Updated on

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे गृहमंत्री सातारा जिल्ह्यावर असतानाच औंध पोलिस ठाण्याचे लॉकअप तोडून पळून गेलेल्या 5 दरोडेखोर प्रकरणी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे यांच्यासह पाच पोलिस कर्मचार्‍यांना निलंबित केले.

दै. 'पुढारी'ने दि. 11 रोजी 'पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर… कॅप्टन 'त्यांना' आणा वठणीवर,' असे रोखठोक वृत्त प्रसारित केल्यानंतर लगेचच 'कॅप्टन इन अ‍ॅक्शन' मोडमध्ये येत कारवाई केली.

स.पो.नि. प्रशांत बधे, पोलिस हवालदार संतोष कोळी, कुंडलिक कटरे, शिवानंद नारायणी, अंकुश गलंडे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांची नावे असून त्यांची प्राथमिक चौकशी (पीई) लावण्यात आली आहे. 9 मे रोजी पहाटे औंध पोलिस ठाण्याचे लॉकअप तोडून पाच अट्टल दरोडेखोर पळाले. या घटनेने परिसरासह जिल्हा हादरून गेला.

8 व 9 मे रोजी राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे-पाटील यांच्यासह अनेक मातब्बर मंत्री सातारा जिल्हा दौर्‍यावर होते. अशावेळी पोलिसांनी अलर्ट असणे गरजेचे असताना औंध पोलिसांचा मात्र गलथान कारभार सुरू होता. याचाच गैरफायदा घेत दरोडेखोरांनी लॉकअपचे दार तोडून पळ काढला. यावेळी पोलिसांना देखील धक्काबुक्की झाली. यामुळे लॉकअपचे दार तोडेपर्यंत पोलिस काय करत होते, असा सवाल उपस्थित झाला. या एका घटनेने पोलिस दल कामाला लागले असतानाच दुसरीकडे दि. 9 रोजी सांयकाळी लोणंद येथील पोलिस हवालदाराने 20 हजार रुपयांची लाच स्वीकारली यामुळे सातारा जिल्हा पोलिस दलाची अब्रूच चव्हाट्यावर आली.

एकाच दिवशी घडलेल्या या घटनांमुळे पोलिस दल गॅसवर गेले. दि. 9 रोजी घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण पोलिस दल दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन राबवण्यात आले. त्यानुसार 3 दरोडेखोर सापडले असून 2 दरोडखोर पसारच आहेत. दरोडेखोर पळून गेल्यानंतरही दोन दिवस पोलिसांवर कोणतीही कारवाई झाली नव्हती. यामुळे दि. 11 रोजी दै.'पुढारी'ने याबाबत रोखठोक भूमिका घेवून पोलिस दलातील ज्या ज्या विभागाचा गलथान कारभार सुरु आहे त्या विभागांची पिसे काढत इत्तंभूत माहिती प्रसिध्द केली.

पोलिस अधीक्षकांनी कामचुकारपणा करणार्‍यांना वठणीवर आणण्याची गरज असल्याने 'पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर..कॅप्टन 'त्यांना' आणा वठणीवर,' या वृत्ताद्वारे व्यक्त केली. दै. 'पुढारी'च्या या वृत्तानंतर लगेचच दि. 11 रोजी एसपी अजयकुमार बन्सल यांनी पाच जणांना निलंबित केले. औंध पोलिस ठाण्याच्या कारभार्‍यांना निलंबित केल्यानंतर त्या जागी सपोनि दत्तात्रय दराडे यांची नियुक्ती करत असल्याचा आदेश पोलिस अधीक्षकांनी दि. 11 रोजी काढला. दरम्यान, एसपींच्या या कारवाईनंतर तरी आता जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी प्रभावीपणे काम करुन गुन्हेगारीला पायबंद घालतील अशी अपेक्षा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news