सातारा पालिकेत घंटागाडी टेंडरमध्ये भ्रष्टाचार : आ. शिवेंद्रराजे | पुढारी

सातारा पालिकेत घंटागाडी टेंडरमध्ये भ्रष्टाचार : आ. शिवेंद्रराजे

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सातारा नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच सातार्‍यात विकासकामे सुरु असून त्यासाठी सत्ताधार्‍यांकडून कमिशन, हप्ते घेतले जात आहेत. नगरपालिका निवडणुकीच्या फंडासाठीच रखडलेली कामे तातडीने मार्गी लावा असे नेत्यांकडून सांगितले जात आहे का? बायोमायनिंग प्रकल्प राबवूनही डेपोवर कचर्‍याचे साम्राज्य का आहे? हा प्रकल्प कुणासाठी राबवला? या प्रकल्पाचे रेकॉर्ड का नाही? असा सवाल करत सातारा पालिकेत घंटागाडीच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप नगर विकास आघाडीचे नेते आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला.

जिल्हा बँकेत संचालक मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पालिकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने सातारा विकास आघाडीच्या नेत्यांनी बैठक घेऊन कामे तातडीने करण्याचा आदेश दिला आहे. सातारा पालिकेचे कामकाज हे निवडणूक आयोगाच्या निर्णयावर चालते की काय, हे कळायला काय मार्ग नाही. प्रशासक असलेले सीओ शहराची परिस्थिती, नागरिकांच्या अडचणी बघतात की निवडणुका येणार म्हणून कामे करतात आणि निवडणुका गेल्या की कामे थांबवून ठेवायची, असा हा विचित्र प्रकार आहे. आज सातार्‍यात पाणी टंचाई व पाणी कपात सुरू असून लोकांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नाही. पाच वर्षात सातारा विकास आघाडीचा नियोजनशून्य कारभार सुरु आहे. कास धरणाच्या उंची वाढवण्याचे काम सुरू आहे. मात्र अतिरिक्त पाणीसाठ्याचा वापर होण्यासाठी नवी पाईपलाईन टाकून त्या माध्यमातून पाणी आणण्याचे कोणतेही नियोजन झालेले दिसत नाही. कासची उंची वाढली, धरणाचा साठा वाढला तरीही वाढीव पाणीसाठ्याचा उपयोग सातारकरांना तूर्त तरी होणार नाही. पत्र देणे, फोटो काढणे एवढ्यावरच विषय थांबला आहे. पावसाळ्यापूर्वी कास उंचीचे काम व्हायला हवे होते. अजितदादांमुळे कासला सुप्रमा मिळाली. त्यावेळीही बैठक लावून सुप्रमा मिळाल्या. काम वेळेत होणे गरजेचे होते मात्र काम नेमके कुठे अडकले आहे याची माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असताना खा. उदयनराजे भोसले यांनी विकास कामे तातडीने सुरू करा, असे आदेश दिले आहेत.मुळात हे रस्ते सातारकरांसाठी होतात की ठेकेदारांसाठी होतात. आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांना फंड गोळा करण्यासाठी कामे होतात का? खा. उदयनराजेंनी शहरातील रस्त्यांची कामे सुरू करा असे सांगितले. पण, मे महिना निम्मा संपत आला आहे. पावसाळा तोंडावर आला असताना डांबरीकरण करा असे सांगणे म्हणजे रस्ते सातारकरांसाठी की ठेकेदारांसाठी होतात? नगरपालिका निवडणुकीत त्यांच्या नगरसेवकांना फंड उपलब्ध व्हावा म्हणून ही कामे केली जातात का? पावसाळ्यात केलेले डांबरी रस्ते टिकणार नाहीत. निवडणुकीआधी ठेकेदाराकडून पैसे गोळा करायचे हे त्यांच्या डोक्यात दिसत आहे. दर्जा टिकण्यासाठी रस्त्यांची कामे आता पावसाळ्यानंतरच झाली पाहिजेत. टक्केवारी गोळा करणे, घंटागाड्याचे हप्ते याकडेच सातारा विकास आघाडीचे लक्ष आहे. पैसे गोळा करायचे हाच त्यांचा उद्योग आहे. सध्या घंटागाडीची टेंडर प्रक्रिया सुरू असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. आपल्या मर्जितील ठेकेदार बसवायचे, ठराविक पदाधिकार्‍यांची माणसे त्यामध्ये बसवून केवळ पैसा मिळाला पाहिजे, असा त्यांचा उद्योग सुरू आहे असे कानावर आले आहे. याप्रकरणी माहिती घेवून जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

कचरा घोटाळ्याच्या प्रश्नावर बोलताना आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, बायोमायनिंगचा मोठा प्रकल्प राबवला गेला असताना कचरा डेपोला मोठी आग कशी लागली? बायोमायनिंग केले मग डेपोवर कचर्‍याचे ढिग कसे लागले? प्रकल्पाचे रेकॉर्ड ठेवणे आवश्यक असताना ठेकेदाराने ते का ठेवले नाही? बायोमायनिंगचा फायदा नक्की कोणाला झाला? यापूर्वीही आम्ही केलेल्या तक्रारींमध्ये जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घालून तातडीने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

मालशे पुलासंदर्भात बोलताना आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सभेत मंजुरी मिळाल्यानंतर हे काम झाले आहे. त्यावेळी नगराध्यक्ष व बॉडीतील नगरसेवक काय करत होते? पालिकेने वर्कऑर्डर दिल्यानंतरच हे काम झाले? तुम्ही त्याठिकाणी जावून ताशेरे ओढत असताना तुमचे पदाधिकारी काय करत होते? अधिकार्‍यांनीही या पूलाला मंजूरी कशी दिल? याला जबाबदार कोण?

खा. उदयनराजे यांनी गृहमंत्र्यांची भेट घेवून शहरातील पाकिंग वाहतुकीबाबत बोलणे केले आहे. त्यावर बोलताना आ.शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, पार्किर्ंगबाबत मागेही सेंट पॉल स्कूलला जावून पाहणी केली, त्यावर काय झाले? नुसतीच बातमी आणि पाहणी पुढे काय? वळसे पाटलांना जावून भेटले. फोटोसेशन केले पुढे काय? पार्किंगची अडचण आहे ते केलेच पाहिजे. पुढे काहीतरी झाले पाहिजे ना, असा सवालही आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केला.

हद्दवाढ निधीची उधळपट्टी केल्यास शासनाकडे तक्रार : आ. शिवेंद्रराजे

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, राज्य शासनाने पालिकेच्या हद्दवाढ भागासाठी निधी दिला असून त्याचा योग्य विनियोग झाला पाहिजे. विलासपूर, शाहूनगर, शाहूपूरी , पिरवाडी आदी ठिकाणी या निधीचा वापर करा, असा सुचना मुख्याधिकार्‍यांना केल्या आहेत. रस्ते, गटर, स्ट्रीट लाईट यासाठी निधीचा प्राधान्याने वापर झाला पाहिजे. निधीची उधळपट्टी केल्यास राज्य शासन किंवा संबंधित मंत्र्यांकडे आम्हाला तक्रारी करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Back to top button