सेऊल; पुढारी ऑनलाईन डेस्क
लस नाकारणाऱ्या उत्तर कोरियात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला आहे. देशभरात कोरोनाचा मोठा संसर्ग पसरला असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. येथील ३ लाख ५० हजार लोकांना तापाचे लक्षणे दिसून आली असून त्यांच्यावर उपचार केले जात असल्याचे उत्तर कोरियाकडून सांगण्यात आले आहे.
गंभीर बाब म्हणजे उत्तर कोरियात कोरोना चाचण्या करण्यासाठी पुरेशी आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. उपकरणांचाही अभाव आहे. यामुळे कोरोना उद्रेक वाढल्यास येथील आऱोग्य यंत्रणेवर मोठा ताण येणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
उत्तर कोरियाच्या अधिकृत कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने (KCNA) सांगितले की, एप्रिलच्या अखेरपासून साडेतीन लाख लोक तापाने आजारी पडले आहेत. यातील १ लाख ६२ हजार २०० लोक बरे झाले आहेत. पण तापाची लक्षणे जाणवत असलेले १८ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी एका दिवसात १ लाख ८७ हजार ८०० रुग्णांना उपचारासाठी आयसोलेट करण्यात आले आहे.
KCNA ने म्हटले आहे की, मरण पावलेल्या सहा लोकांपैकी एकाला ओमायक्रॉनची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. पण कोरोनामुळे नेमके एकूण किती लोक आजारी आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दक्षिण कोरियाच्या सेजॉन्ग इन्स्टिट्यूटचे विश्लेषक चेओंग सेओंग-चांग यांनी म्हटले आहे की, तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे हे संकट पुढील काही महिने अथवा २०२३ पर्यंत राहू शकते. यामुळे देशातील कमकुवत आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ शकतो.
कोविड-१९ चा उद्रेक झाल्याचे कबूल केल्यानंतर उत्तर कोरियाने गुरुवारी देशव्यापी लॉकडाउन लागू केला होता. जगभरात गेली अडीच वर्षे कोरोनाने हाहाकार घातला होता. पण आता कुठे उत्तर कोरियाने कोरोनाच्या पहिल्या प्रकरणाची पुष्टी केली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन यांनी देशात गंभीर राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली आहे. तसेच कोविड-१९ चा पहिला रुग्ण आढळून आल्याने महामारीचा समूळ नायनाट करण्यासाठी देशव्यापी लॉकडाउनचे आदेश त्यांनी दिले आहेत. देशातून कोरोना व्हायरस नष्ट करण्याची त्यांनी ग्वाही दिली आहे.
KCNA च्या वृत्तात म्हटले आहे की किम यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना कमी वेळेत कोरोना महामारीचे मूळ नष्ट करण्यावर भर द्या असे आदेश दिले आहेत. किम यांनी सीमांवर नियंत्रण ठेवा आणि कडक लॉकडाउन लागू करण्याबाबतही आदेश दिलेत.
उत्तर कोरियाने त्यांच्या अडीच कोटी लोकांचे लसीकरण केलेले नाही. त्यांनी लस पुरवठा करण्याबाबत आलेल्या ऑफरही नाकारल्या होत्या.