

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इन्स्टाग्रामवर 'रिल्स' बनविण्यासह मराठी बालकलाकाराची आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या संशयित पूजा भोईरचा पती विशांत विश्वास भोईर (३५, रा. कल्याण, ठाणे) याला शहर आर्थिक गुन्हेशाखेने अटक केली आहे. पूजाप्रमाणेच त्यानेही डझनभर गुंतवणूकदारांना काेट्यवधींचा गंडा घातल्याची माहिती प्राथमिक तपासातून समाेर आले आहे. भोईरला सोमवार (दि.१०) पर्यंत न्यायालयाने पाेलिस काेठडी सुनावली आहे.
संशयित रिल्सस्टार पूजा भोईरने 'अल्गो ऑप्शन्स ट्रेडिंग'च्या माध्यमातून अनेकांना गुंतवणुकीचे आमिष दाखवत गुंतवणुकीवर ७.७ टक्के मोबदला देण्याचे सांगत फसवणूक केल्याचा प्रकार तीन महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याने अतुल सोहनलाल शर्मा (६६, रा. सिरीनमिडोज, गंगापूर रोड) यांनी सरकारवाडा पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार भोईर पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्पूर्वीच, संशयित पूजावर मुंबईतही गुन्हा दाखल झाल्याने तिला पोलिसांनी अटक केली होती.
मुंबई पाेलिसांकडून नाशिक पोलिसांनी पूजाचा ताबा घेत तपास सुरू केला. यात पूजाच्या बँक खात्यांसह विशांतचेही बरेच आर्थिक व्यवहार शहर पाेलिसांना आढळून आले. हे व्यवहार महत्त्वपूर्ण व संशयास्पद असल्याने पूर्वीच्या गुन्ह्यात मुंबई पाेलिसांच्या ताब्यात असलेल्या विशांतचा ताबा आर्थिक गुन्हे शाखेने घेतला. दरम्यान, भोईर पती-पत्नीने विदेश दौरे केले आहे. विशांतनेसुद्धा पत्नीच्या मदतीने अनेकांना गंडविल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याचे बँकिंग व्यवहार, मालमत्ता, व्यवहार कुठे आणि कसे झाले, त्याचा सर्वंकश तपशील आर्थिक गुन्हेशाखेने मिळविण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा :