स्पेनमध्ये ताम्रयुगात होती मातृसत्ताक संस्कृती | पुढारी

स्पेनमध्ये ताम्रयुगात होती मातृसत्ताक संस्कृती

माद्रिद : सन 2008 मध्ये स्पेनच्या पुरातत्त्व संशोधकांनी एका उच्चपदस्थ व्यक्तीचे थडगे शोधून काढले होते. आयबेरियन पेनिन्सुलामध्ये ही व्यक्ती 3200 ते 2200 वर्षांपूर्वीच्या काळात अस्तित्वात होती. या थडग्यातील व्यक्तीचे अवशेष पुरुषाचे असावेत असे आधी संशोधकांना वाटले होते. मात्र, आता एका नव्या संशोधनानुसार हे अवशेष पुरुषाचे नसून ते महिलेचे आहेत. ताम—युगात स्पेनमधील समाजातात पुरुषप्रधान नव्हे तर स्त्रीप्रधान म्हणजेच मातृसत्ताक संस्कृती होती असे दिसून आले आहे.

स्पेनमधील पुरातत्त्व संशोधकांनी या महिलेला ‘आयव्हरी लेडी’ असे संबोधले आहे. याचे कारण म्हणजे थडग्यात तिच्या डोक्याशेजारी अनेक हस्तिदंत ठेवलेले आढळून आले. अन्यही काही वस्तू या थडग्यात होत्या. त्यामध्ये शहामृगाच्या अंड्याचे कवच, अंबर (घनीभूत झालेला झाडाचा डिंक) व अन्य वस्तूंचा समावेश आहे. अनेक दशके संशोधकांना वाटत होते की ही व्यक्ती पुरुष आहे. त्यांनी त्याला ‘आयव्हरी मर्चंट’ असे नाव दिले होते.

‘सायंटिफिक रिपोर्टस्’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. स्पेनच्या सेव्हीली युनिव्हर्सिटीमधील लिओनार्डो गार्सिया सॅन्जुआन यांनी सांगितले की पूर्वी झालेल्या संशोधनानंतर असे वाटले होते की हे पुरुषाचे अवशेष आहेत. विशेषतः ओटीपोटाच्या भागाच्या विश्लेषणानंतर असा समज झाला होता. मात्र, हा भाग चांगल्या रितीने जतन झालेला नसल्याने संशोधकांनी नव्याने अभ्यास करताना नवी पद्धत वापरली. त्यांनी कवटीमधील दातावर असलेल्या इनॅमलचे ‘अ‍ॅमेलोजेनिन पेप्टाईड अ‍ॅनालिसिस’ केले. त्यामध्ये ‘एएमईएलएक्स’ जनुक आहे का हे पाहण्यात आले. हे जनुक एक्स गुणसुत्रावर असते. या संशोधनानंतर आढळले की हा सांगाडा पुरुषाचा नसून तो एका महिलेचा आहे. या महिलेविषयी फार काही समजू शकले नसले तरी एकेकाळी ती अत्यंत वरच्या पदावर होती. राजा व राण्यांच्या उदयापूर्वीच्या समाजात नेतृत्व करणार्‍या महिलांपैकी ती होती. तिला हे पद वंशपरंपरेने नव्हे तर तिचे व्यक्तिगत गुण, कौशल्य आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व यामधून मिळाले होते. या परिसरात एकाच व्यक्तीसाठी असलेल्या थडग्यांपैकी तिचे हे थडगे आहे. आयबेरियन ताम—युगातील म्हणजेच इसवी सनपूर्व 2900 ते इसवी सनपूर्व 2650 या काळातील तिचे स्थान दर्शवणारे हे थडगे आहे.

Back to top button