‘रक्तरंजित’ राजकारण : पं. बंगालमध्‍ये मतदानावेळी हिंसाचार ९ ठार, जाणून घ्‍या ठळक घडामोडी

‘रक्तरंजित’ राजकारण : पं. बंगालमध्‍ये मतदानावेळी हिंसाचार ९ ठार, जाणून घ्‍या ठळक घडामोडी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पश्‍चिम बंगाल राज्‍यात पंचायत निवडणुकीसाठी ( Bengal Panchayat Polls ) आज ( दि. ८) सकाळी मतदानास प्रारंभ झाला. मतदानावेळी हिंसाचाराच्‍या अनेक घटना समोर येत आहेत.  हिंसाचारात ९ जण ठार झाले आहेत. यामध्‍ये तृणमूलचे पाच, भाजप, डावे आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक कार्यकर्ता आणि अपक्ष उमेदवाराच्या समर्थकाचा समावेश असल्‍याचे अधिकार्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे. अनेक ठिकाणी हिंसाचारामध्‍ये अनेक लोक जखमी झाले, दोन मतदान केंद्रांमधील मतपेट्यांची नासधूस करण्यात आल्‍याचे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.

मुर्शिदाबाद-कूचबिहारमध्ये हिंसाचार सुत्र सुरुच

मुर्शिदाबाद आणि कूचबिहार या दोन जिल्‍ह्यांमधील पंचायत निवडणुका जाहीर झाल्‍यापासून हिंसाचाराचे सत्र सूरुच राहिले आहे. दाेन्‍ही जिल्‍ह्यात आज मतदान सुरु होताच काही केंद्रांवर हिंसाचार झाल्‍याच्‍या घटना समोर येत आहेत.  मुर्शिदाबादमधील बेलडांगा येथे काँग्रेस आणि तृणमूल यांच्यात झालेल्या संघर्षात तृणमूलचा कार्यकर्ता बाबर अली ठार झाला. हिंसाचारानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे.तृणमूल काँग्रेसने कूचबिहारच्या गितालदहा-२ ग्रामपंचायतीमध्ये बीएसएफवर मतदारांना धमकावल्याचा आरोप केला. बीएसएफच्या जवानांनी मतदान प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे, त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग केला. कूचबिहारमध्ये एका मतदान केंद्राची तोडफोड केली आणि मतपत्रिका लुटल्या. यानंतर त्यांनी मतदान केंद्राला आग लावली.

Bengal Panchayat Polls : राज्‍यपालांकडून पाहणी

पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस राज्‍यातील वेगवेगळ्या भागातील स्‍वत: फिरुन सुरक्षा व्‍यवस्‍थेचा आढावा घेत आहेत. शनिवारी मतदान सुरू होताच ते उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बराकपूरमधील बासुदेबपूर गावात गेले. येथे ग्रामस्‍थांनी राज्यपालांच्या ताफ्याला घेराव घातला. राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी सर्व तक्रारी ऐकून घेतल्या. मतांच्या नावावर फसवणूक सुरु असून, तुम्ही स्वत: पाहा, अशी विनंती त्‍यांनी राज्‍यापालांकडे केली.

निवडणुका गोळ्यांनी नव्हे, मतपत्रिकांनी व्हाव्यात : राज्यपाल

यावेळी राज्‍यापाल सीव्ही आनंद बोस म्हणाले, "मी सकाळपासून स्‍वत: रस्‍त्‍यावर उतरलो आहे. लोकशाहीसाठी हा सर्वात पवित्र दिवस आहे. निवडणुका गोळ्यांनी नव्हे तर मतपत्रिकेने व्हाव्यात, असा टोलाही त्‍यांनी ममता बॅनर्जी सरकारला लगावला.

 केंद्रीय सुरक्षा दल केवळ बघ्‍याच्‍या भूमिकेत : तृणमूल

पूर्व मेदिनीपूरच्या कांठी येथील बरोज ग्रामपंचायत उमेदवार उत्पल जाना यांच्यावर गुंडांनी केलेला हल्‍ला हा लोकशाहीवरील लांच्छनास्पद हल्ला आहे. निरपराधांच्या रक्षणासाठी तैनात असलेले केंद्रीय सुरक्षा दलांनी केवळ बघ्‍याच्‍या भूमिकेत राहिले आहे. आम्ही या रानटी कृत्याचा तीव्र निषेध करतो आणि आमच्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची मागणी करतो!, असे ट्विट तृणमूलने केले आहे.

'तृणमूल'च्या गुंडांकडून माझ्या कार्यकर्त्याची हत्या : भाजप उमेदवाराचा आरोप

कूचबिहारच्या फालीमारी ग्रामपंचायतीच्या मतदान केंद्रावर गुंडांनी केलेल्या हल्ल्यात भाजप उमेदवाराचा पोलिंग एजंट माधव विश्वास यांचा मृत्यू झाला. उमेदवार माया बर्मन म्हणाल्या की टीएमसीच्या गुंडांनी माझ्या बुथ एजंटवर बॉम्ब फेकून त्याची हत्या केली. माझ्यावरही हल्ला केला. बारासातमध्ये मतदान केंद्र उद्ध्वस्त करत मतपेट्यांची चोरी झाल्‍याचा दावाही त्‍यांनी केल्‍या.

Bengal Panchayat Polls : जवानांना बूथवर पाठवण्यात आले नाही : भाजप

हिंसाचाराबाबत बोलताना भाजप नेते राहुल सिन्हा म्हणाले की, केंद्रीय दले राज्‍यात तैनात करण्‍यात आली; पण त्यांना मतदान केंद्रांवर पाठवण्यात आले नाही.निवडणुकीच्या नावाखाली हिंसाचार सूरु आहे. याला जनतेची निवडणूक म्हणू शकत नाही. अनेक भागातून हिंसाचार आणि गटांमध्‍ये संघर्ष झाल्‍याचे वृत्त आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news