येथील जेबापूर रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला असून कांदा मार्केटमधून कांदा घेऊन पिंपळनेरकडे येणारे ट्रॅक्टर पलटी होवून अपघात झाला आहे. त्यात सुदैवाने ट्रॅक्टरचालकासह मजुरांचेही प्राण वाचले आहेत. परंतु कांदा आणि वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
त्याचप्रमाणे बुधवारी (दि.19) दुपारी दोनच्या सुमारास कांदा मार्केटमध्ये लिलाव झाल्यानंतर छाईल येथील ट्रॅक्टरचालक कांदा भरून पिंपळनेरकडे येत होता. यावेळी सुदाम गोरख पगारे यांच्या खासगी शेताजवळ समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देतांना व खड्डा चुकवताना ट्रॅक्टर रस्त्याच्याकडेला पलटी झाला आहे. सुदैवाने ट्रॅक्टरचालक व ट्रॉलीवर बसलेल्या मजुरांचे प्राण वाचले. येथील रस्त्याकडे मार्केट कमिटी तसेच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. तसेच दिवाळीनंतर एकादशीला तीर्थक्षेत्र आमळी येथे देखील तीन ते चार दिवसाचा मोठा यात्रोत्सव भरतो. या यात्रेलाही रस्त्याने व्यापारी, यात्रेकरूंचे जत्थे जात असतात. त्यामुळे त्यांना वारंवार अपघाताला सामोरे जावे लागत असल्याने त्वरीत येथील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.