Congress President Poll Results | काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे विजयी, २४ वर्षांनी गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीची निवड | पुढारी

Congress President Poll Results | काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे विजयी, २४ वर्षांनी गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीची निवड

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन; काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक (Congress President Poll Results) मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी जिंकली आहे. यामुळे काँग्रेसला तब्बल २४ वर्षांनी नेहरू-गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष मिळाला आहे. अध्यक्षपदाची निवडणुकीत खर्गे यांनी शशी थरूर यांचा पराभव केला आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांना ७,८९७ मते मिळाली आहेत. तर शशी थरूर यांना सुमारे १,००० मते मिळाली असून ४१६ मते बाद ठरली आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी ९६ टक्के मतदान झाले होते. आज मंगळवारी (दि.१९) मतमोजणी झाली. खर्गे यांना गांधी कुटुंबाचा पाठिंबा राहिला असल्याचे समजते. काँग्रेसच्या बहुतांश वरिष्ठ नेत्यांनी खर्गे यांना पाठिंबा जाहीर केला होता. यामुळे त्यांचा विजय या निवडणुकीत निश्चित होता.

९,९०० पैकी ९,४०० वर प्रदेश काँग्रेससमिती प्रतिनिधींनी गुप्तमतदानाद्वारे पक्षप्रमुख निवडीसाठी आपापला कौल दिला होता. पक्षाच्या १३७ वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा एआयसीसी मुख्यालय आणि देशभरातील ६८ मतदान केंद्रांवर मतदान झाले. राहुल गांधी यांनीही भारत जोडो यात्रा शिबिरात संगनाकल्लू येथे उभारलेल्या बूथवर रांगेत उभे राहून मतदान केले होते. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि प्रियांका गांधी-वधेरा यांनी दिल्लीतील एआयसीसी मुख्यालयात मतदान केले होते. महाराष्ट्रातून ५६१ पैकी ५४७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. (Congress President Poll Results)

शशी थरुर यांचा निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप

काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांनी काँग्रेस केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांना पत्र लिहून, ‘उत्तर प्रदेशमधील निवडणूक प्रक्रियेत अत्यंत गंभीर अनियमितता’ असल्याचा आरोप केला आहे आणि उत्तर प्रदेशमधील सर्व मते अवैध मानली जावीत अशी मागणी केली आहे.

खर्गे : तीन वेळा मुख्यमंत्रिपद हुकले, पण आशा सोडली नाही…

गांधी घराण्याचे दीर्घकाळ निष्ठावंत म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांना ओळखले जाते. खर्गे यांना तीनवेळा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे. १९९९, २००४ आणि २०१३ मध्ये ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. पण तीनवेळा त्यांना अपयश आले. या काळात अनुक्रम एस एम कृष्णा, धरम सिंह आणि सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपदी बाजी मारली. माजी विद्यार्थी नेते, गुलबर्गा शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नऊ वेळा आमदार राहिलेल्या खर्गे यांनी कधीही आशा सोडली नाही. त्यांना लोकसभा आणि आता राज्यसभेतील पक्षाचा नेता म्हणूनच आतापर्यंत समाधान मानावे लागले आहे. आता गांधी घराण्याच्या पाठिंब्यावर अध्यक्षपदावर विराजमान झाले आहेत. हिंदी भाषेवर प्रभुत्व असलेले स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष झालेले दक्षिणेतील ते सहावे नेते ठरले आहेत. खर्गे पहिल्यांदा १९६९ मध्ये त्यांच्या मूळ ठिकाणी गुलबर्गा शहर काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते. त्यानंतर खर्गे यांची राज्याच्या राजकारणात प्रदीर्घ कारकीर्द राहिली. १९७२ मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. ते विधानसभा निवडणुकीत आठ वेळा निवडून आले आहेत.

१९७६ मध्ये देवराज सरकारमध्ये ते पहिल्यांदा मंत्री झाले होते. त्यानंतर ते आमदार असताना १९८० मध्ये गुंडू राव, १९९० मध्ये एस बंगारप्पा आणि १९९२ ते १९९४ दरम्यानच्या एम वीरप्पा मोईली सरकारमध्ये मंत्रा राहिले आहेत. ते १९९६-९९ आणि २००८-०९ मध्ये विरोधी पक्षनेते होते आणि २००५-०८ पर्यंत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. २००९ मध्ये त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. त्यांना मनमोहन सिंग मंत्रिमंडळात पहिल्यांदाच कामगार मंत्री म्हणून संधी मिळाली. त्यानंतर रेल्वे आणि सामाजिक न्याय मंत्री ही खातीदेखील त्यांनी देण्यात आली होती.

हे ही वाचा :

Back to top button