परभणी : परतीच्या पावसाचा ताडकळस परीसराला तडाखा; सोयाबीन, कापूस पिकांचे मोठे नुकसान | पुढारी

परभणी : परतीच्या पावसाचा ताडकळस परीसराला तडाखा; सोयाबीन, कापूस पिकांचे मोठे नुकसान

ताडकळस; पुढारी वृत्तसेवा : पूर्णा तालुक्यातील ताडकळस परिसराला गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा तडाखा बसला आहे. सोयाबीन, कापूस, तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धानोरा काळे येथील नागनाथ रेंगे यांच्या शेतातील कडब्याच्या ओळइ (गंजी) वर वीज पडल्याने जळून खाक झाली.

जोरदार पावसाने गोदावरी नदीसह छोटे-मोठे ओढे दुथडी भरुन वाहत आहेत. दिग्रस बंधारा तुडुंब भरला असून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पावसाने सोयाबीन, कापूस, तूर पिकांचे तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मुंबर, गोळेगाव, धानोरा काळे, बानेगाव, कळगाव, ताडकळस कळगाववाडी, फुलकळस, बलसा (बु) खांबेगाव, एखुरखा येथील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. वेचनिस आलेल्या कापसाचे सततच्या पावसाने अतोनात नुकसान झाले आहे. कापलेले सोयाबीनही पावसाने वाहून गेले. तसेच उभे असलेल्या सोयाबीनच्या शेंगांना अंकुर फुटले आहेत. हाता तोंडाशी आलेले पीक गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. प्रशासनाने अद्यापही पंचनामे केले नसल्याने तात्काळ पंचनामे करून सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी व पीकविमाही तात्काळ मंजूर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ताडकळस परीसरात शिवारात गेले चार दिवसापासून जोरदार होत असलेल्या पावसाने सोयाबीन, कापूस, तुर पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तात्काळ नुकसानीची पाहणी करून सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी.
– दिलीप आंबोरे, शेतकरी, ताडकळस, ता.पूर्णा

हेही वाचा :

Back to top button