वायसीएम रुग्णालयाचा भोंगळ कारभार: महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल; नातेवाईकांनी केले अंत्यसंस्कार | पुढारी

वायसीएम रुग्णालयाचा भोंगळ कारभार: महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल; नातेवाईकांनी केले अंत्यसंस्कार

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: रुग्णलायाच्या भोंगळ कारभारामुळे महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल झाली. विषेश बाब म्हणजे एका महिलेच्या नातेवाईकांनी मृतावर अंत्यसंस्कार केले. पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात बुधवार १९ ऑक्टोबर रोजी दुपारी हा प्रकार घडला.

प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी (दि. १८) दापोडी येथे भिंत पडून एका महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचे वायसीएम रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, थेरगाव परिसरातील एका मृत महिलेचे देखील शवविच्छेदन करण्यात आले होते. शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेह एकाच ठिकाणी ठेवण्यात आले होते.

बुधवारी सकाळी थेरगाव येथील मृत महिलेच्या नातेवाईकांनी शवविच्छेदनगृहातून मृतदेह नेला. मात्र, तो मृतदेह दापोडी येथील मृत महिलेचा होता. त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, दापोडी येथील मृत महिलेचे नातेवाईक मृतदेह घेऊन जाण्यासाठी शवविच्छेदनगृहात आले. त्यावेळी त्यांना थेरगाव येथील मृत महिलेचा मृतदेह देण्यात आला. मात्र संबंधित मयत व्यक्ती आपले नातेवाईक नसल्याचे दापोडीमधील नातेवाईकांच्या लक्षात आले. त्यामुळे मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे उघडकीस आले.

दापोडी येथील महिलेचा मृतदेह थेरगाव येथे नेण्यात येऊन अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे महिलेच्या नातेवाईकांना समजले. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर वायसीएम रुग्णालयात गोंधळ होऊन तोडफोड झाली. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

Back to top button