नाशिक : जिल्ह्यात मान्सूनपूर्वने दिली ओढ, चालू महिन्यात केवळ 4 टक्के पर्जन्य

नाशिक : जिल्ह्यात मान्सूनपूर्वने दिली ओढ, चालू महिन्यात केवळ 4 टक्के पर्जन्य
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्याच्या काही भागांना मान्सूनपूर्व सरींनी झोडपून काढले असताना, नाशिक जिल्ह्यात मात्र पावसाने ओढ दिली आहे. जिल्ह्याचे आजपर्यंत केवळ 4 टक्के पर्जन्याची नोंद झाली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी याच काळात 40.6 टक्के पावसाची नोंद झाली होती.

मान्सूनच्या आगमनाला काहीसा ब्रेक लागला असला, तरी राज्यात कोकणपट्टीसह कोल्हापूर, सातारा, सांगलीसह अन्य काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व सरींनी झोडपून काढले. त्यामुळे त्या भागातील जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, त्याचवेळी नाशिक जिल्ह्यावर मान्सून रुसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात चांदवड, सिन्नर, नांदगाव तसेच येवला तालुका वगळता, अन्य तालूक्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने यंदा म्हणावी तशी वर्दी दिलेली नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत 4 टक्के पावसाची नोंद झाली आहे. चांदवडला सर्वाधिक 36.7 मिमी पाऊस बरसला. सिन्नरमध्ये 27.4, येवल्यात 11.3, नांदगावला 10.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर पावसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या इगतपुरीत अवघा 0.1 मिमी पाऊस पडला. हे प्रमाण बघता, तो असून नसल्यासारखा आहे. अन्य तालुक्यांमध्ये मात्र, मान्सूनपूर्व सरींनी पाठ फिरविली आहे.

मुळात देवभूमी केरळमध्ये यंदा मान्सूनचे वेळेआधीच आगमन झाले. त्याचा पुढील प्रवास वेगाने होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. परंतु, तो साफ चुकीचा ठरला. सध्या मान्सूनची गती मंदावली आहे. त्यामुळे राज्यात मान्सूनचे आगमन चार ते पाच दिवस लांबणीवर पडले आहे. परिणामी नाशिक जिल्ह्यातही पावसाचे आगमन एक-दोन दिवस मागे-पुढे होण्याची शक्यता आहे.

धरणांमध्ये 28 टक्के साठा…
जिल्ह्यातील प्रमुख 24 धरणांमध्ये सोमवारी (दि. 6) एकूण पाणीसाठा 18,515 दलघफू इतका नोंदविण्यात आला. त्याचे प्रमाण 28 टक्के आहे. गंगापूर धरणात सध्या 30 टक्के पाणी असून, ते 1,694 दलघफू इतके आहे, तर समूहातील साठा 2,709 दलघफू (27 टक्के) इतका आहे. दरम्यान, गेल्यावर्षी या काळात जिल्ह्यात 16,909 दलघफू (26 टक्के) साठा होता.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news