नाशिक : गॅसगळती झाल्याने पोल्ट्री फार्ममधील 2,300 पक्ष्यांचा मृत्यू | पुढारी

नाशिक : गॅसगळती झाल्याने पोल्ट्री फार्ममधील 2,300 पक्ष्यांचा मृत्यू

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
मुंबई-आग्रा महामार्गावर एलपीजी गॅसचा टँकर उलटला अन् त्यातून गॅसगळती होऊन जवळील पोल्ट्री फार्ममधील सुमारे 2,300 पक्षी गतप्राण झाले. सौंदाणे शिवारातील देवळा फाटा परिसरात ही घटना घडली.

हरिष अहिरे यांचा हा अत्याधुनिक पोल्ट्री फार्म आहे. त्यात वातानुकूलन यंत्रणा बसविलेली आहे. या फार्मपासून अवघ्या 500 फुटांवर महामार्गावर शनिवारी (दि.4) एक गॅस टँकर उलटला. त्यातून गॅसगळती होऊन परिसरात तो पसरला. हा गॅस पोल्ट्रीच्या वातानूकुलित भागात पोहोचल्याने तब्बल 2,300 पक्षी दगावलेत. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पशुधन विकास अधिकारी डॉ. जावेद खाटीक यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृत पक्ष्यांचे विच्छेदन करून नमुने घेण्यात आले. ते पंचवटी (नाशिक) येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून, साधारण आठवडाभरात अहवाल प्राप्त होईल. त्यानंतरच पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे डॉ. खाटीक यांनी सांगितले. त्यांना सहायक आयुक्त डॉ. पी. एफ. गायकवाड, डॉ. भाग्यश्री बिरासदार यांनी सहाय्य केले. अहिरे यांच्या फार्ममध्ये 12 हजार पक्ष्यांची क्षमता आहे. सध्या त्यांनी 10 हजार 200 पक्षी ठेवले आहेत. त्यातील 2,300 पक्षी दगावल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा :

Back to top button