मालेगाव पुन्हा गोळीबाराने हादरले | पुढारी

मालेगाव पुन्हा गोळीबाराने हादरले

 मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव शहर पुन्हा एकदा गोळीबाराने हादरले. व्यवहारातील शिल्लक पैसे देण्यासाठी युवकाला अल्लमा एकबाल पुलावर बोलावून घेत मारहाण करण्यात आली. तो दुचाकीवरून निघून जाण्याच्या बेतात असतानाच एकाने गोळीबार केला. जवळील नागरिकांनी आरोपीचा हात पकडल्याने गोळी हवेत सुटली अन्यथा अनर्थ घडला असता, अशी नोंद झाली आहे.

थोडक्यात बचावलेल्या वकार अली ख्वाजा अझमत अली (26, रा. नया आझादनगर) याने किल्ला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्याने वर्षभरापूर्वी आरफात (रा. संगमेश्वर) याला दुचाकी विक्री केली होती. तेव्हा व्यवहारातील 70 पैकी फक्त 40 हजार रुपये मिळाले होते. उर्वरित 30 हजार रुपयांसाठी त्याचा तगादा सुरू होता. तेव्हा रविवारी (दि.5) रात्री 9.30 वाजता आरफात याने वकारला फोन करून पैसे घेण्यासाठी अल्लमा एकबाल पुलावर येण्यास सांगितले. त्याप्रमाणे वकार हा मित्र गुड्ड्यासमवेत दुचाकीने त्या ठिकाणी गेले. तेव्हा भाचा (पूर्ण नाव माहिती नाही, आरिफ कुरेशीचा भाचा) याने पैसे दिले नाही तरी काही करू शकणार नाही, अशी दमबाजी केली. त्यासोबतच्या बबलू ऊर्फ बिल्डर व चार -पाच साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

हा प्रकार पाहून वकार मित्रासमवेत दुचाकीवरून निघाले तेव्हा आराफात याने बंदूक काढून त्यांच्या दिशेने रोखली. हा प्रकार पाहून काहींनी आराफातचा हात पकडल्याने गोळी हवेच्या दिशेने सुटली. त्यांनी किल्ला पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, सोमवारी सायंकाळी पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाच्या सूचना दिल्यात.

अजून किती बंदुकबाज…
कधीकाळी कटरची दहशत असणार्‍या मालेगावात आता किती बंदुकबाज असतील, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. गुन्हेगारांना सहजरीत्या गावठी कट्टे, बंदुका आणि तलवारी उपलब्ध होत असल्याचे अनेक घटनांमधून उघड झाले आहे. परंतु, त्यांच्या पुरवठा मार्गाचा शोध घेण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. क्षुल्लक कारणांवरून गोळीबार करण्यात गुन्हेगार कचरत नाहीत. एवढेच नव्हे तर पकडण्यासाठी येणार्‍या पोलिसांवरही बंदूक रोखण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. नगरसेवकाच्या घरावर बेछूट गोळीबारही घडून चुकला आहे.

हेही वाचा :

Back to top button