नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा
मध्य रेल्वेच्या विविध रेल्वेस्थानकांचा कायापालट करून त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अमृत भारत स्थानक योजना सुरू करण्यात आली असून, त्यामध्ये मुंबई विभागातील १२ स्थानकांपैकी विक्रोळी येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी भुसावळ मंडळाच्या निरीक्षण समितीमार्फत करण्यात आली. (Amrit Bharat Station Scheme)
'अमृत भारत स्थानक' योजनेंतर्गत (Amrit Bharat Station Scheme) मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील १५ स्थानकांचे विकासकामे रेल्वेने हाती घेतले आहे. यापैकी परळ, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि भायखळा रेल्वेस्थानकांचे पुनर्विकास काम सुरू आहे. प्रवाशांचा राबता असलेल्या विक्रोळी स्थानकात १९.६० कोटी रु. खर्चाचे काम सुरू आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात स्थानकाच्या पुनर्विकासचे काम रेल्वेने हाती घेतले असून, या योजनेमध्ये आराखड्यानुसार स्टेशनवरील सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रवाशांचा प्रवेश दोन्ही बाजूने सुकर करणे, अंध व दिव्यांग बांधवांसाठी विशेष सोयी, नव्याने स्वच्छतागृहे उभारणी, आवश्यकतेनुसार लिफ्ट/एक्सलेटर, पार्किंग व स्वच्छता व्यवस्था, स्थानकाच्या सौंदर्यामध्ये भर घालणारी रचना, सर्व कार्यालये एकाच ठिकाणी नवी इमारत उभारणे अशी कामे प्रगतिपथावर आहेत. या कामांचे निरीक्षण व पाहणी समितीचे अशासकीय सदस्य प्रशांत धिवंदे, अंबादास शिंदे, भय्यासाहेब कटारे यांच्यासह नाशिकरोड रेल्वे उपस्टेशन प्रबंधक (वाणिज्य) अमोल ठाकूर आदींच्या पथकाने केली. यावेळी डीसीएम (कोचिंग) अमिषा, स्टेशन प्रबंधक मधू कौंजर, सीसीआय पवन कुमार यांनी पथकाचे स्वागत करत स्थानकात नव्याने निर्माण करण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती दिली. (Amrit Bharat Station Scheme)