धक्‍कादायक : अमरावती-नागपूर महामार्गावर ट्रॅव्हलरवर अंदाधुद गोळीबार; चालकासह ४ प्रवासी जखमी | पुढारी

धक्‍कादायक : अमरावती-नागपूर महामार्गावर ट्रॅव्हलरवर अंदाधुद गोळीबार; चालकासह ४ प्रवासी जखमी

अमरावती, पुढारी वृत्तसेवा अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर एका ट्रॅव्हलर वाहनावर काल (रविवार) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोळीबारानंतर संशयीत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेत चालकासह अन्य चार प्रवासी किरकोळ जखमी आहेत. जखमींना तिवसा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या विषयी मिळालेल्‍या अधिक माहितीनुसार, टेम्पो ट्रॅव्हलर क्रमांक एम एच 14 जीडी 6955 ने नागपूर येथील तीन ते चार कुटुंब शेगाव येथे दर्शनासाठी गेले होते. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह महिला, पुरुष आणि लहान बालके देखील होती. शेगाव येथून गजानन महाराजांचे दर्शन घेऊन ते सर्व परत येत होते. अमरावती ओलांडून त्यांचे वाहन नागपूरच्या दिशेने नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत आले असता अज्ञात संशयीत आरोपींनी बोलेरो वाहनातून टेम्पो ट्रॅव्हलरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि अचानक चालक व प्रवाशांच्या दिशेने असलेल्या खिडकीवर अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. एकाएकी गोळीबार करण्यात आल्यामुळे चालकासह वाहनातील प्रवासी भयभीत झाले होते.

चालकाने प्रसंगावधान राखत आपले वाहन रस्त्यात मध्ये कुठेही न थांबवता थेट तिवसा पोलीस स्टेशन गाठले आणि तेथे सर्व घटनाक्रम सांगितला. मात्र, ही घटना तिवसा पोलीस स्टेशन हद्दी ऐवजी नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत घडल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान ही घटना शहर पोलीस आयुक्त हद्दीत घडल्यामुळे पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. पोलीस आरोपींचा कसून शोध घेत असून, त्यांनी हा गोळीबार नेमका कोणत्या उद्देशाने केला याचा उलगडा पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button