मनमाड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; कधी अस्मानी तर कधी सुलतानी, असे एका पाठोपाठ येणारे संकट शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. शेतकऱ्यांना दर घसरणीच्या रूपाने आलेल्या संकटाला तोंड द्यावे लागत असून, गेल्या एक महिन्यापासून टोमॅटोच्या भावात सुरू झालेली घसरगुंडी सुरूच आहे. बाजार समितीत टोमॅटोच्या 20 किलोच्या क्रेटला 20 ते 30 रुपये अर्थात प्रतिकिलो दीड रुपये इतकाच भाव मिळत आहे.
सध्या मिळत असलेल्या भावात पिकांवर केलेला खर्च तर सोडाच, तोडणीसाठी आणि वाहतुकीवर केलेला खर्चदेखील निघणार नसल्याचे पाहून हवालदिल झालेल्या पानेवाडी येथील साहेबराव काकड या शेतकऱ्याने तोडणीला आलेला दीड एकरवरील टोमॅटो पीक तसेच शेतात सोडून दिले. अशीच परिस्थिती मनमाड, नांदगावसह संपूर्ण तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. सरकारने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
कांदा, मका पाठोपाठ टोमॅटोला नगदी पीक मानला जातो. त्यामुळे मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या भावात मोठी वाढ होऊन टोमॅटोला प्रतिकिलो तब्बल 150 ते 200 रुपये इतका प्रचंड भाव मिळाला होता. या भाववाढीमुळे काही शेतकरी थेट लखपती झाले होते. भाव टिकून राहील या आशेवर पानेवाडी येथील साहेबराव काकड या शेतकऱ्याने दीड एकरावर टोमॅटोची लागवड केली होती. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी कांद्याऐवजी ऊन टोमॅटोची लागवड केली आहे. तिकडे पावसाने पाठ फिरवून दगा दिल्यामुळे शेतकऱ्यांनी पाणी विकत घेऊन पीक जगविले. शिवाय बियाणे, मशागत, खत, औषधे, तार, बांबू, सुतळी, मजुरी आदींसह इतर कामे धरून एकरी किमान 40 ते 50 हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च आला. मात्र, अचानक टोमॅटोच्या भावात मोठी घसरण सुरू झाली असून, बाजार समितीत टोमॅटोच्या 20 किलोंच्या एका क्रेटला 20 ते 30 रुपये दर मिळत आहे.
कष्टाने पिकवलेल्या टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्याचे पाहून शेतकरी मेटाकुटीला आला आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे पिके उद्ध्वस्त झाली होती. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे खरीपसोबत रब्बीचा हंगामही हातातून जाणार आहे. कर्ज घेऊन टोमॅटोची लागवड केली, मात्र त्याला भाव नाही. त्यामुळे करावे तरी काय? जगावे तरी कसे? असा प्रश्न काकड यांनी केला आहे.
हेही वाचा :