ठळक मुद्दे
बिबट्यांना जेरबंद करण्याची नागरिकांची संतप्त मागणी
जर बिबट्यांचा बंदोबस्त होत नसेल तर पिंजऱ्यामध्ये आम्ही मुलांना ठेवायचे काय ?
बिबट्यांना ठार करण्यासंदर्भात परवानगी करीता नागपूर कार्यालयाला कळविले
नाशिक : वडनेर परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त न झाल्यास नागरिकच बिबट्यांना पकडून वन विभागाच्या कार्यालयात सोडतील असा इशारा वडनेर परिसरातील नागरिकांना वन विभागाला दिला आहे. वन विभागाच्या मुख्य कार्यालयासमोर वडनेर परिसरातील नागरिकांनी गुरूवारी (दि. 25) आंदोलन करत बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी केली. तसेच जर बिबट्यांचा बंदोबस्त होत नसेल तर पिंजऱ्यामध्ये आम्ही मुलांना ठेवायचे काय ?
वडनेर दुमला परिसरात ८ ऑगस्ट रोजी आयुष्य किरण भगत व २३ सप्टेंबर रोजी श्रुतीक गंगाधर या दोन चिमुकल्यांचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर सदर परिसरात संतापाचे वातावरण पसरले असून नागरिक आता आक्रमक झाले आहेत. या विरोधात गुरूवारी (दि.25) नागरिकांनी वन विभागाच्या मुख्य कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत संताप व्यक्त केला. यावेळी नागरिकांनी निवेदन दिले.
त्यात वन विभागाकडून केवळ पिंजरे लावण्याचा देखावा केला जात आहे. त्यामुळे केवळ पिंजरे लावण्यापेक्षा जोपर्यंत बिबटे पकडले जात नाहीत. तोपर्यंत वन विभागाने त्या ठिकाणी २४ तास कर्मचारी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी माजी नगरसेवक केशव पोरजे, माजी नगरसेविका सुनिता कोठुळे, योगेश गाडेकर, मनोहर बोराडे, जयंत गाडेकर, उतम कोठुळे, भैया मणियार, सुधाकर जाधव, अमित जाधव, बंटी कोरडे, संजय हंडोरे, समाधान कोठुळे, अमोल अल्हाट, माधुरी ओहळ, उत्तम जाधव, शाईद शेख, अन्सार शेख, दत्तात्रय पाळदे, वाळू पोरजे, अरुण गडकर, बाळू बोराडे, त्र्यंबक पोरजे, संजय गायकर, संजय पोरजे, नितीन हंडोरे, महेंद्र पोरजे, राजू पावर आदी उपस्थित होते.
बिबट्यांना ठार करण्यासाठी पत्र व्यवहार
नरभक्षक बिबट्यांचा लवकरच बंदोबस्त केला जाईल. बिबट्यांना ठार करण्यासंदर्भात देखील नागपूर कार्यालयाला कळविलेले आहे. परवानगी मिळाल्यानंतरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल. तसेच वडनेर परिसरामधील सर्व बिबटे जोपर्यंत पकडले जाणार नाहीत तोपर्यंत तिथून रेस्क्यू पथक हलवणार नाही असे आश्वासन यावेळी मुख्य वनसंरक्षक मल्लिकार्जुन जी. व सहाय्यक वनसंरक्षक प्रशांत खैरनार यांनी नागरिकांना दिले आहे. त्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.