

नाशिक : वडनेर गेट परिसरातून काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना समोर आली आहे. अवघ्या दोन वर्षांच्या श्रुतिक गंगाधर नावाच्या दोन वर्षाच्या चिमुकल्याला त्याच्या घराच्या जवळूनच नरभक्षक बिबट्याने उचलून नेले. परिसरात शेकडो नागरिक व वन विभागाचे कर्मचारी या चिमुकल्याचा मंगळवार ( दि.23 ) रोजी रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते
मिळालेल्या माहितीनुसार, वडनेर गेट परिसरातील कारगिल गेट जवळ असलेल्या क्वार्टरमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील दोन वर्षीय श्रुतिक मंगळवार ( दि.23 ) सायंकाळच्या वेळी घराबाहेर खेळत होता. अचानक, जवळच्याच झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने क्षणार्धात त्याच्यावर झडप घातली आणि त्याला तोंडात धरून जंगलाच्या दिशेने ओढत नेले.
विशेष म्हणजे, अवघ्या दीड ते दोन महिन्यांपूर्वीच वडनेर दुमाला येथे आयुष किरण भगत या तीन वर्षांच्या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर या परिसरामध्ये बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे वाढविण्यात आल्याने दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात यश आले होते. मात्र तरीही या परिसरामध्ये बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. लहान कोवळे बालकांना बिबट्या भक्षक बनवत असल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मंगळवार ( दि.23 ) रोजी रात्री उशिरापर्यंत माजी नगरसेवक केशव पोरजे जगदीश पवार यांच्यासह शेकडो नागरिक लहान मुलाचा शोध परिसरात घेत होते.
सिन्नर ( नाशिक ) : तालुक्यातील उजणी येथे रविवारी (दि. २२ ) रोजी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले आहे. योगेश शिंदे हा युवक संगमनेर येथे जात असताना शिंदेवाडी - उजणी रोडवर कोंडाजी हांडोरे यांच्या वस्तीलगत त्याला अचानक बिबट्याचे दर्शन घडले आहे.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी अनावश्यक रात्रीच्या वेळेस वावर टाळावा अशी खबरदारी घेण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. दोन बालकांचा मृत्यू आणि एक जखमी झाल्याच्या घटनेनंतर वनविभागाने आठवडाभर मोठ्या प्रमाणात पथके तैनात करून दोन बिबटे जेरबंद केले आहे. त्यानंतर अद्यापही अशा पद्धतीने बिबट्यांचा वावर आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. वनविभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली असून पिंजरे लावणे तसेच बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
सिन्नरला भर दिवसा बिबट्यांच्या जोडीचे दर्शन..
दरम्यान मंगळवारी ( दि.23 ) दुपारी कानडी मळ्या परिसरात राजेंद्र कोकाटे यांच्या घरासमोर बिबट्यांच्या जोडीचे दर्शन घडले असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. यापूर्वीही उकाडे मळ्यात विहिरीच्या मलब्यावर बिबट्या निवांत बसलेला आढळून आला होता.