Diwali 2023 : सलग मुहूर्तांमुळे वाहन बाजारात तेजोमयी दिवाळी

Diwali 2023 : सलग मुहूर्तांमुळे वाहन बाजारात तेजोमयी दिवाळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन विक्रीतून मोठी उलाढाल झाली असली तरी, दिवाळीच्या शुभमुहूर्तावर यापेक्षाही अधिक उलाढाल होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांकडून बुकींगचा धडाका लावला असून, लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर डिलिव्हरी घेण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे. तर मुहूर्तावर डिलिव्हरी देण्याचे मोठे आव्हान वाहन विक्रेत्यांसमोर निर्माण झाले आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर नवी कार तसेच दुचाकी घरी आणण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. नाशिकचे आॅटोमोबाइल क्षेत्र बऱ्यापैकी ग्रामीण भागावर अवलंबून आहे. पाऊसपाणी समाधानकारक झाल्यास त्याचा फायदा आॅटोमोबाइल क्षेत्राला होत असल्याचे बोलले जाते. यंदा तुलनेत पाऊस कमी असला तरी, ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेते सांगतात. गेल्या दसऱ्याला दुचाकी आणि चारचाकीमध्ये सुमारे ४५ कोटींपेक्षा अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला गेला. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर यापेक्षा अधिक उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. सध्या शहरातील बहुतांश शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी बघावयास मिळत आहे. कर्ज काढून वाहन घेवू इच्छिणाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच वाहन बुकींग केले आहे. कारण कर्ज प्रक्रियेला तीन ते चार दिवसांचा अवधी लागत असल्याने, लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताच्या बेताने खरेदी केली जात आहे.

दुचाकी बाजारात १०० आणि ११० सीसी क्षमतेच्या वाहन खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. शहरी भागातील तरुणांबरोबरच ग्रामीण भागातील तरुण ११० सीसी क्षमतेचे वाहन खरेदी करत आहेत. दुसरीकडे चारचाकीमध्ये एसयूव्ही कारला अधिक प्राधान्य दिले जात आहे. काही कारला सहा महिन्यांपेक्षा अधिक वेटींग असल्याने, मुहूर्तावर गाड्या उपलब्द करून देण्याचे मोठे आव्हान विक्रेत्यांसमोर आहे.

वाहनांवर बंपर डिस्काऊंट

यंदा बहुतांश कंपन्यांनी आपल्या वाहनांवर बंपर डिस्काऊंट दिले आहे. चारचाकी वाहनांवर बहुतांश कंपन्यांनी २५ हजारांपेक्षा अधिक डिस्काऊंट उपलब्ध करून दिला आहे. तसेच एक्सचेंजला १५ ते २० हजार रुपयांचा फायदा करून दिला जात आहे. दुचाकींमध्ये चांगल्या आॅफर्स असल्याने खरेदी जोरात आहे. विक्रेत्यांच्या आॅफर्समुळे ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण बघावयास मिळत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news