कराची : औषधी गुणधर्म असलेला दुर्मीळ गोल्डफिश मासा सहसा जाळ्यात सापडत नाही; पण पाकिस्तानच्या एका गरीब मच्छीमाराच्या जाळ्यात एवढ्या मोठ्या संख्येने गोल्डफिश सापडले की, ते विकून या मच्छीमाराला तब्बल ७ कोटी रुपयांची कमाई झाली.
कराची बंदरातील मासेबाजारातील मुबारक खान यांनी सांगितले की, इब्राहिम हैदरी या छोट्या मच्छीमारी गावात राहणाऱ्या हाजी बलोच या मच्छीमाराचे नशिब गोल्ड फिशने फळफळले. त्याच्या जाळ्यात स्थानिक भाषेत सोवा मासा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोल्डफिशचा मोठा साठा सापडला. औषधी गुणधर्म असलेला हा मासा सहसा इतक्या मोठ्या संख्येने पकडला जात नाही. हाजी बलोच याने पकडलेल्या माशांचा लिलाव करण्यात आला तेव्हा काही मिनिटांत तब्बल सात कोटी रुपयांना हे मासे विकले गेले. हा एक मासा २० ते ४० किलो वजनाचा असतो. तो साधारणतः दीड मीटर लांबीचा असतो. पूर्व आशियाई देशांत या माशांना प्रचंड मागणी असून, हे मासे बाजारात आले की, हातोहात संपतात.