सातारा : ग्रामसेवक देता का कुणी ग्रामसेवक?… | पुढारी

सातारा : ग्रामसेवक देता का कुणी ग्रामसेवक?...

ढेबेवाडी; पुढारी वृत्तसेवा : ग्रामसेवक वेळेवर येत नाही, ग्रामस्थांची कामे वेळेवर होत नाहीत अशी तक्रार केल्यानंतर बदली झालेल्या ग्रामसेवकाच्या जागेवर कार्यक्षम ग्रामसेवकाची नियुक्ती केली जात नाही. सहा महिन्यांपासून ग्रामसेवक पद रिक्त आहे. त्यामुळे गलमेवाडीतील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

गलमेवाडीत नियुक्ती झालेला ग्रामसेवक वेळेवर येत नाही आणि त्यामुळे ग्रामस्थांची कामे वेळेवर होत नाहीत. ग्रामपंचायत कर वसुली होत नाही. विकासकामे वेळेत होत नाहीत अशा अनेक तक्रारी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आल्या होत्या. हे ग्रामसेवक आठ – आठ दिवस गावाकडे फिरकतही नव्हते. त्यामुळे ज्या ग्रामसेवकाबाबत तक्रारी होत्या, त्यांची प्रशासनाने बदली केली. त्यानंतर या ग्रामसेवक पदावर दुसर्‍या कार्यक्षम ग्रामसेवकाची नियुक्ती व्हावी, अशी मागणी स्थानिकांनी केली होती. प्रशासनाने ही मागणी मान्य करून जवळपास सहा महिने झाले आहेत. मात्र शुक्रवारपर्यंत नवीन ग्रामसेवक हजर झाले नव्हते, अशी माहिती गलमेवाडीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी दिली आहे. तसेच शुक्रवारी एक ग्रामसेवक आले होते, पण ते नियमितपणे येणार का? असा प्रश्नही ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित करत आहेत.

जून 2023 मध्ये कुंभारगांव व मालदन ग्रामपंचायतीकडे कार्यरत अनिल जाधव यांची नियुक्ती करून त्यांच्याकडे गलमेवाडीचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. पण आजअखेर गलमेवाडी ग्रामपंचायतीकडे हजर होऊन त्यांनी चार्जच घेतलेला नाही. परिणामी ग्रामपंचायतीची सर्व कामे ठप्प झाली आहेत. तर प्रशासनाला सर्व महिती असूनही त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतलेली नाही, असा दावाही ग्रामस्थांनी केला आहे.

सहा महिन्यांपासून ग्रामसेवक नाही. प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. अतिरिक्त कार्यभार असलेले ग्रामसेवक आमच्या गावात येतच नाहीत. तालुका प्रशासनही दुर्लक्ष करत असल्याने याप्रश्नी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.
– दत्तात्रय चोरगे.
माजी सरपंच गलमेवाडी.

Back to top button