नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा
सातपूरचे ग्रामदैवत असलेल्या भवानीमातेच्या यात्रेनिमित्त गुढीपाडव्याच्या दिवशी बारागाड्या ओढण्याची परंपरा आहे. या यात्रा उत्सवाचे प्रतीक असलेल्या बैलगाडीचे शिल्प सातपूरच्या महिंद्रा सर्कलवर उभारण्यात आले आहे.
वासाळी येथील शिल्पकार दीपक भालेराव यांनी या आकर्षक आणि सुबक शिल्पाची निर्मिती केली असून, यातील बैलगाडी लोखंडी धातूची आहे, तर गणेशाची मूर्ती एफआरपीपासून तयार केली आहे. हे शिल्प बसविण्यासाठी माजी नगरसेविका सीमा निगळ यांनी पुढाकार घेतला आहे. लवकरच या शिल्पाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या शिल्पामुळे सातपूरच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.