घोडेबाजारात विकले गेलेल्यांची यादी आमच्याकडे, संजय राऊतांचा अपक्षांना इशारा | पुढारी

घोडेबाजारात विकले गेलेल्यांची यादी आमच्याकडे, संजय राऊतांचा अपक्षांना इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यसभा निवडणुकीत जास्त बोली लागली असेल त्यामुळे घोडेबाजार झाला. पण घोडेबाजारात विकले गेलेल्यांची नोंद झाली असून ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे. कालचा निकाल हा जनतेचा कौल नसूल घोडेबाजार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

मतं शोधण्यासाठी निवडणूक आयोगाने सात तास घेतले. एक व्हीडीओ तपासायला ७ तास लागतात का? ईडी, सीबीआयचा वापर करता पण केंद्रीय निवडणूक आयोगावरही दबाव टाकण्यात आला का? असे सवाल खासदार राऊत यांनी उपस्थित केले आहेत. घोडेबाजाराला विरोधकांकडून उत्तेजन दिले गेले. काही बाजारातले घोडे विकले गेले, कदाचित जास्त बोली लावली असेल. पण घोडेबाजारात विकले गेलेल्यांची यादी आमच्याकडे आहे. निवडणुकीत आमचा पराभव झाला हे नक्की पण भाजपचा मोठा विजय झाला नसल्याचे ते म्हणाले.

सुहास कांदे यांचं मत बाद झालं. तेच कारण मुनगंटीवारांबाबतही झाले. निवडणुकीत देवेंद्र भुयार, संजयमामा शिंदे यांची मतं मिळाली नाहीत तसेच बविआचीही मते मिळाली नाहीत. निवडणुकीत घोडेबाजार झाला पण आम्ही व्यापार केला नाही. भाजपला पहाटेची पापकृत्ये करण्याची फार सवय आहे. त्यामुळे भाजपचा पहाटेपर्यंत उपक्रम सुरू होता, अशी टीका राऊत यांनी केली. तसेच मतदान करताना धार्मिक प्रदर्शन करायचं नसतं पण तरीही अमरावतीचे शहाणे करतात, अशी टीका राणा दाम्पत्यावर नाव न घेता राऊतांनी केली.

हेही वाचलंत का? 

Back to top button