नाशिक : ‘सिटीलिंक’कडून वाहतूक नियमांची मोडतोड

नाशिक : पंचवटी कारंजा येथे बसथांबा सोडून भररस्त्यात उभी केलेली सिटीलिंकची बस. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक : पंचवटी कारंजा येथे बसथांबा सोडून भररस्त्यात उभी केलेली सिटीलिंकची बस. (छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळाची सिटीलिंक बससेवा प्रवाशांच्या पसंतीस उतरली असली तरी या बससेवेच्या वाहक-चालकांकडून वाहतूक नियमांची मोडतोड केली जात असल्याने मोठ्या दुर्घटनांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे महामंडळाच्या अधिकार्‍यांनी संबंधित बाबींकडे काणाडोळा न करता वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना समज देण्याची गरज निर्माण झाली आहे.

गेल्या दीड वर्षापासून महापालिकेची सिटीलिंक बससेवा सुरू झाली असून, अल्पावधीत या बससेवेला नाशिककरांकडूनच नव्हे, तर ग्रामीण भागातील प्रवाशांकडूनही पसंती दर्शविली जात आहे. बससेवा सुरू झाली तेव्हा सुरुवातीला वाहक-चालकांकडून नियमांचे पालन केले जात होते. त्याचबरोबर प्रवाशांचीही काळजी घेतली जात होती. परंतु, नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे आता चालकांकडून वाहतूक नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केले जात असल्याने अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. या आधी नाशिकरोड, मुंबई नाका, द्वारका या भागांत अपघातांना सामोरे जावे लागले असून, तीन नागरिकांचा बळीदेखील गेला आहे. यानंतरही चालकांबरोबरच अधिकारीवर्गाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याची बाब समोर आली आहे. शहरात विविध ठिकाणी बसथांबे निर्माण करण्यात आले आहेत. काही ठिकाणी बसथांब्यांचे आकर्षक शेड उभे करण्यात आले आहे, तर शेड नसलेल्या ठिकाणी रस्त्यांवरच बस थांबण्याच्या जागेचे मार्किंग केलेले आहे. परंतु, या बसथांब्यांच्या ठिकाणी बस न थांबविता बर्‍याचदा रस्त्यांच्या मधोमध बस थांबविली जात असल्याने एकतर वाहतूक कोंडी होते. शिवाय बसमध्ये चढणार्‍या तसेच उतरणार्‍या प्रवाशांना रस्त्यातच उतरावे लागते. यामुळे मागून येणारी वाहने धडकण्याची भीती असते. यामुळे याबाबत दखल घेण्याची गरज प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

फायद्या-तोट्याचे गणित कळेना!
सिटीलिंककडून सध्या नवनवीन मार्गांवर बसेसच्या फेर्‍या वाढविण्यात येत आहेत. मग यातून संबंधित मार्गावर सुरू केलेल्या बसेस फायद्यात आहेत की नुसत्या तोट्यात याचे गणितही मांडले जात नसल्याने सिटीलिंकचा तोटा कमी होण्याऐवजी वाढतच आहे. या आधीही आयुक्तांनी तोट्यात चालणार्‍या बसेसच्या फेर्‍या कमी करण्याचे तसेच बसेसच बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार होते. परंतु, अशा प्रकारचे सखोल सर्वेक्षण झालेच नाही. या उलट नवनवीन मार्गांवर बसेस सुरू करण्याचा धडाका अधिकार्‍यांकडून सुरू आहे. बर्‍याच मार्गांवर गरज असताना त्या ठिकाणी बसेस सुरू केल्या जात नाही तसेच छोट्या बसेस अपुर्‍या पडत असल्याने सीएनजीवर चालणार्‍या मोठ्या बसेसची गरज असूनही त्या ठिकाणी दुर्लक्ष केले जात असल्याने अधिकार्‍यांच्या भूमिकेविषयीच शंका निर्माण होते.

पाट्या कोर्‍याच
शहरातील प्रत्येक बसथांब्यांच्या ठिकाणी हिरव्या रंगाच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. त्यावर बसेसचे क्रमांक तसेच नावे टाकण्याचा विसर सिटीलिंकच्या अधिकार्‍यांना पडलेला दिसतो. गेल्या काही महिन्यांपासून सिटीलिंकच्या पाट्या कोर्‍याच दिसून येत असल्याने बाहेरील प्रवाशांना तसेच शहरातील नागरिकांना बसेसचे क्रमांक व मार्ग कळण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news