मंचर : शाळेकडे जाणार्‍या रस्त्याची दुरवस्था; खानदेशी मळा, लोंढे मळा येथील नागरिक वैतागले | पुढारी

मंचर : शाळेकडे जाणार्‍या रस्त्याची दुरवस्था; खानदेशी मळा, लोंढे मळा येथील नागरिक वैतागले

मंचर; पुढारी वृत्तसेवा: मंचर-पिंपळगाव रस्त्यावरील खानदेशी मळा, लोंढे मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे जाणार्‍या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा भरावा तसेच नवीन डांबरी रस्ता करण्याचे आश्वासन अनेक राजकीय नेत्यांनी देऊनही त्याची पूर्तता केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. गतवर्षी स्थानिक रहिवाशी तसेच शेतकरी यांनी मागणी केल्यामुळे या पावसाळ्यात मोठमोठे दगड, मुरूम प्रशासनाने टाकले. परिणामी वाहतुकीसाठी अडचण झाली आहे.

या रस्त्याने शेतकरी, कामगार, तसेच जिल्हा प्राथमिक शाळेतील मुले ये-जा करतात. येथे बर्‍याच वेळा छोटे-मोठे अपघात झाले आहेत. पावसाळ्यात रस्त्यावरील पावसाचे पाणी व चिखलाने रस्ता निसरडा होऊन दुचाकीस्वार आणि शाळेतील मुले घसरून अपघात झाले आहेत, अशी माहिती माजी सरपंच मोहन डावखरे यांनी दिली.

सध्या रस्ता चिखलमय व निसरडा झाला आहे. हा रस्ता दूध गवळी, शेतकरी, कामगार, लहान मुले, शेतीतील अवजारे यासाठी खानदेशी, गांजाळे, थोरात, लोंढे तसेच अन्य मळ्यातील सर्वांसाठी उपयुक्त असल्याने तो दुरुस्त होणे गरजेचे आहे, असे सामाजिक कार्यकर्ते रामदास जाधव यांनी सांगितले. मंचर नगरपंचायतीला यापूर्वी अनेकदा निवेदने देऊनही कार्यवाही झालेली नाही.

याबाबत रहिवाशांच्या भावना तीव्र आहेत. स्थानिक निवृत्त बँक अधिकारी रघुनाथ वायकर यांनीही रस्ता व्यवस्थित होत नसल्याने नाराजी व्यक्त केली. माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप थोरात म्हणाले, रस्त्याच्या कामासाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला. परंतु एका अल्पभूधारक शेतकर्‍याने विरोध केल्याने निधी परत गेला आहे. निधी उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

 

Back to top button