नाशिक : दोन तासांचे अथक प्रयत्न अन् बिबट्याला जीवदान

नाशिक : दोन तासांचे अथक प्रयत्न अन् बिबट्याला जीवदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
तालुक्याच्या पूर्वभागात विहिरीत पडलेल्या दोन वर्षांच्या बिबट्याच्या मादीला जीवदान देण्यात वनविभागाच्या पथकाला मंगळवारी (दि.15) यश आले आहे. अन्न-पाण्याच्या शोधात बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. तर बिबट्यास पिंजर्‍याच्या सहाय्याने विहिरीबाहेर जेरबंद केल्याने स्थानिक शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

मौजे जाखोरी येथील शेतकरी प्रसाद बोराडे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती वनविभागाला मिळाली. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन लोखंडी खाट व पिंजर्‍यांच्या सहाय्याने बिबट्याला बाहेर काढण्यास सुरुवात केली. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला यशस्वी रेस्क्यू करण्यात वनकर्मचार्‍यांना यश आले. पिंजर्‍यात जेरबंद केल्यानंतर बिबट्याला सुरक्षितरीत्या गंगापूर रोपवाटिका येथे ठेवण्यात आलेले आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वरिष्ठ वनाधिकार्‍यांनी सांगितले.

शेवगेदारणात आढळला मृत बिबट्या
दरम्यान, मौजे शेवगेदारणा येथील शेतकरी चंद्रभान कासार यांच्या शेतात अंदाजे एक वर्षाचा नर बिबट्या मृतावस्थेत मिळून आला. मृत बिबट्याची पाहणी केली असता मानेवर जखमा आढळल्या आहेत. हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात बिबट्या ठार झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून प्रचलित पद्धतीने गंगापूर रोपवाटिकेत अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news