नाशिक : गोदावरीच्या अविरत प्रवाहासाठी ब्रह्मगिरीवर वृक्षारोपण

नाशिक : त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी येथे वृक्षारोपण करताना ‘नमामि गोदा फाउंडेशन’चे कार्यकर्ते.
नाशिक : त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी येथे वृक्षारोपण करताना ‘नमामि गोदा फाउंडेशन’चे कार्यकर्ते.
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उगमापासूनच प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या गोदावरीस प्रदूषणमुक्त करताना ती अविरत प्रवाही राहावी यासाठी लढा उभारणार्‍या नमामि गोदा फाउंडेशनने तिच्या अविरत प्रवाहास सहाय्य करण्याच्या दिशेने महत्त्वाकांक्षी पाऊल टाकले. जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून ब्रह्मगिरी पर्वतावर गोदेच्या मुखाजवळ लोकसहभागातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आला.

जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्या प्रेरणेतून ही संकल्पना राबविण्यात येत आहे. येणार्‍या काळात ब्रह्मगिरी परिसरात विविध समाजसेवी तथा पर्यावरण संस्थांच्या मदतीने संपूर्ण गोदावरी पाणलोटात या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार असून, त्याचा एक भाग म्हणून ही वृक्षारोपण मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेत झाडे लावण्याबरोबरच ती जगवण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती नमामी गोदा फाउंडेशनचे पदाधिकारी राजेश पंडित व प्रसिद्ध अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी दिली. लोकांना स्वत:ची झाडे आपल्या आप्तांच्या स्मृती जोपासण्याकरिता किंवा त्यांचा कार्याचा गौरव म्हणून तिथे लावता येणार आहे. त्याचं संगोपन नमामि गोदाच्या वतीने करण्यात येणार आहे. लोकांनी आपण लावलेल्या झाडांना अधूनमधून भेट देणे अपेक्षित राहील. संस्थेच्या वतीने जीपीएस टॅगिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकांना आभासी माध्यमातून या झाडाची वाढ होताना बघता येणार आहे. ब्रह्मगिरी कृती समितीचे कार्यकर्ते अंबरिश मोरे यांनी या उपक्रमासाठी डोंगराची धूप थांबावी यासाठी पन्नास बांबूची रोपे देण्याची घोषणा केली.

नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी ब्रह्मगिरी परिसरात साठणार्‍या प्रचंड कचर्‍याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिक बंदीची मागणी केली. याप्रसंगी स्मार्ट सिटी नाशिकच्या स्वाती चव्हाण, अटल आखाड्याचे उदयगिरी महाराज, सौ. अग्रवाल, आर्चित मांडवकर, नीलेश शिंदे, संजय झनकर, तेजस तलवारे, ऋषिकेश नाझरे, दत्तू ढगे, चंद्रशेखर पाटील, मनोज साठे, प्रशांत परदेशी आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news