सातारा राजकारण : निवडून जायचं जावलीतून अन् बँकेत पोरं भरायची कोरेगाव, खटावची ; आ. शिवेंद्रराजे | पुढारी

सातारा राजकारण : निवडून जायचं जावलीतून अन् बँकेत पोरं भरायची कोरेगाव, खटावची ; आ. शिवेंद्रराजे

मेढा : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा बँकेसाठी जावलीतून निवडून जायचं आणि बँकेत कोरेगावची अनं खटावची पोर भरायची आणि वर जावलीच्या स्वाभिमानाची भाषा करायची. ही प्रथा आता जावलीत चालणार नाही, असा इशारा आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी आ. शशिकांत शिंदे यांना लगावला.
गांजे ते मोठ्याचीवाडी रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी आ. शिवेंद्रराजे बोलत होते. यावेळी जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे, एकनाथराव पवार, लक्ष्मण देशमुख, पंचायत समिती सदस्य विजय सुतार, प्रतापगड कारखाना संचालक दिलीप वांगडे, मेढा सेंटर सोसायटी संचालक डॉ. रामदास वांगडे, गांजे सरपंच लक्ष्मी चिकणे, दिनकर गायकवाड, बाजीराव चिकणे, कास समितीचे अध्यक्ष मारूती चिकणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपण पाहिलं कोणी गद्दारी केली ते. ज्या देशमुखांनी गद्दारी केली आहे त्यांना आता सुट्टी नाही. बँकेच्या ठरावाला स्वतः त्यांच्या मताचे ठराव करून सुद्धा निम्याच्यावर लोक तुमच्या विरोधात जातात हे संबधितांनी लक्षात घेतले पाहिजे. दीड फुट्याकडे बघून घेतो अन् मुंबईच्या भाईची भिती घालायची असलं काही आता चालणार नाही. मुंबईची भाईगिरी मुंबईलाच ठेवायची. यापुढे आपला सातारा -जावलीचा कार्यकर्ता मुंबईच्या भाईगिरीला घाबरणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांना जर भिती घातली तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही शिवेंद्रराजेंनी दिला.

गद्दारी करणार्‍या देशमुखांना आता सुट्टी नाही. खर तर महाराष्ट्रात अनेक खानदानी देशमुख आहेत, परंतु, बँकेच्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांच्याबरोबर एकत्र राहण्याचे नाटक करून त्यांच्याच पैशावर मजा मारून त्यांच्या विरोधात गेलेल्या देशमुख याला यापुढे वेळ येईल त्या वेळेस जागा दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा :

 

 

Back to top button