

अकोला : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषद हातरुण गटाच्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या लिना सुभाष शेगोकार यांचा विजय झाला. त्यांच्या विजयाने वंचितचे जि. प. मधील संख्याबळ वाढले. त्यांनी शिवसेनेच्या अश्विनी गवई यांचा १६४१ मतांनी पराभव केला. शेगोकार यांना ४३०१ तर गवई यांना २६६० मते मिळाली. शेगोकार यांच्या विजयाचा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
रविवारी येथे मतदान झाले होते. तर सोमवारी सकाळी मतमोजणी होऊन निवडणूक निर्णय अधिकारी राजेश पुरी यांनी लिना शेगोकार यांना विजयी घोषित केले. यावेळी भाजपच्या राधिका पाटेकर यांना २०९१, काँग्रेसच्या रशिका इंगळे यांना ३६२, अपक्ष अनिता भटकर यांना ३९ तर नोटाला १२७ मते मिळाली. गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुनिता गोरे यांनी ९८ मतांनी वंचितच्या उमेदवाराचा पराभव केला होता. परंतु मध्यंतरी घडलेल्या घडामोडीत सुनिता गोरे अपात्र ठरल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी मतदान झाले.
रविवारी ५५.७७ टक्के मतदान झाले होते. येथे मतदारांची एकूण संख्या १७,१७८ होती. यात पुरुष मतदार ९०१५ तर स्त्री मतदार ८,१६३. एकूण ९,५८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात पुरुष ५४१० तर ४१७० स्त्री मतदारांनी हक्क बजावला. हातरूणच्या विजयामुळे वंचित बहुजन आघाडीच्या जागेत १ ने वाढ झाली. वंचितच्या आता २५, शिवसेना १२, भाजपा ५, काँग्रेस ४, रा.काँ ४, प्रहार १, अपक्ष २.
जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या ५३ आहे. हातरूणची पोटनिवडणूक विविध राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. वरिष्ठ नेत्यांनी प्रचाराची धुरा वाहिली. परंतु, ग्रामीण भागात वर्चस्व कायम ठेवण्यात वंचितने यश प्राप्त केले.
हातरुण लोहारा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचितच्या लिनाताई सुभाष शेगोकार १७०० मतांनी विजयी झाल्या आहेत. अॅड. बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे नेतृत्वाखाली हातरुण लोहारा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचितच्या लिनाताई सुभाष शेगोकार विजयी झाल्या आहेत.
राष्ट्रवादी, प्रहार, भाजप आणि काँग्रेसला हादरा दिला. राजकीय पक्षांना पराभूत करण्याची किमया फक्त वंचितमध्येच आहे. अशा प्रकारची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे वंचित बहूजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी दिली आहे.
अकोल्यातील वंचितच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एक मापदंड सेट केला आहे की, एकदिलाने लढले की पाच सहा कितीही राजकीय पक्ष विरोधात असू द्या वंचित विजय होतोच हे सिद्ध झाले आहे. भविष्यात काही ठिकाणी आणखी पोटनिवडणूक लागणार आहे. व्याळा जिल्हा परिषद येथील सेनेच्या अपात्र होणाऱ्या आणखी एका सदस्याच्या रिक्त होणाऱ्या सदस्यांच्या एससी राखीव जागेवर निकाल असाच एकतर्फी आणि वंचितच्या बाजूने असेल ह्यात तिळमात्र शंका नाही असेही राजेंद्र पातोडे म्हणाले.