नाशिक : बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे ऊसतोडणी कामगार मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

कवडदरा : शेतात खेळणारी ऊस तोडणी कामगारांची चिमुकली मुले. (छाया : अमोल  म्हस्के)
कवडदरा : शेतात खेळणारी ऊस तोडणी कामगारांची चिमुकली मुले. (छाया : अमोल म्हस्के)

नाशिक (कवडदरा) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्यात ऊसतोडणीची कामे वेगाने सुरू झाली असून, या भागातील बिबट्यांचा वावरही आढळून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर ऊसतोडीच्या कामांदरम्यान ऊसतोडणी कामगारांसह त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कारखान्यांचा यंदाचा गाळप हंगाम सुरू झाल्याने या भागात ऊसतोड जोरात सुरू झाली आहे. इगतपुरी तालुक्यातील साकूर, घोटी खुर्द, पिंपळगाव, शेणीत, बेलू परिसरातील ऊस तोडणीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. त्यातच परिसरात बिबट्यांचा वावर असल्याचे दिसून आले आहे. ऊसतोडणी मजूर या गावांतून ऊस तोडून अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले कारखान्याकडे ऊस नेत असतात. ऊसतोड कामासाठी सोबत कामगारांची लहान मुलेही आलेली असतात. मात्र ही मुले ऊसाच्या बांधावर, रस्त्यांवर, अडचणीच्या ठिकाणी खेळताना दिसतात. कामगार भल्या पहाटेच अंधार असताना ऊसतोडणीसाठी शेतांमध्ये दाखल होतात. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या लहान लहान मुलांना अनेकदा त्यांना शेतातच झाडांना झोका बांधून झोपवावे लागते. परंतु, ऊसतोडणीचे काम सुरूच ठेवावे लागते. कामाच्या गडबडीत माता-पित्यांचे त्यांच्याकडे अजिबात लक्ष नसते. त्यामुळे रस्त्यांवर खेळत असताना अपघातदेखील घडू शकतात किंवा बिबट्यांचे हल्लेदेखील होऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यासाठी माता-पित्यांनी ऊसतोडणीचे काम सुरू असताना लहान मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे असून, त्यांच्या सुरक्षेलाही प्राधान्य देणे गरजेचे आहे.

जीव मुठीत धरून तोडणी
शिवारात बिबट्यांचे पाळीव जनावरांवर देखील हल्ले मोठ्या प्रमाणात होत आहेत. शेतकर्‍यांना शेतांमध्ये पिकांना पाणी देताना बिबट्यांचे दर्शन अनेकदा होत आहे. त्यामुळे ऊसतोडणी करणार्‍या कामगारांना तर दररोजच जीव मुठीत घेऊन काम करावे लागते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news