नगर : माध्यमिक अहवाल गुलदस्त्यातच! | पुढारी

नगर : माध्यमिक अहवाल गुलदस्त्यातच!

नगर : पुढारी वृत्तसेवा :  माध्यमिक शिक्षण विभागाच्या दप्तर तपासणीत नेमके काय आढळलं, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असताना, काल मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी तपासणी पथकासोबत तातडीची बैठक घेवून चर्चा केली. अहवालात दोषी आढळले, तर अधिकारी व कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या जाणार असल्याचे सूत्रांकडून समजले.
जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर यांनी नुकतीच माध्यमिक शिक्षण विभागाची झाडाझडती घेतली. आपल्या अधिकारी व कर्मचार्‍यांचे पथक तयार करून त्यांच्याकरवी माध्यमिक शिक्षण विभागातील दप्तरांची अचानक तपासणी करण्यात आली. चार दिवस अशाप्रकारे तपासणी सुरू होती.

दरम्यान, या तपासणीचा गोपनिय अहवाल सीईओंकडे शुक्रवारी सादर करण्यात आला. तेव्हापासून या अहवालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. काल मंगळवारी सीईओंनी या संदर्भात तपासणी करणार्‍या पथकासमवेत बैठक घेतली. यावेळी चौकशी अहवालात गंभीर बाबी आढळून आल्याची चर्चा असली, तरी अधिकृत कोणतीही माहिती समजू शकली नाही. मात्र अहवालात कोणी दोषी आढळलेच तर जबाबदार अधिकारी व कर्मचार्‍यांना नोटीसा बजावण्यात येणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून समजले. दरम्यान, सीईओ येरेकर हे या तपासणीबाबत मोठी गोपनियता बाळगत असल्याने याप्रकरणाची आता वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे.

Back to top button