भाजपचे दिग्गज नेते नगर दौर्‍यावर | पुढारी

भाजपचे दिग्गज नेते नगर दौर्‍यावर

नगर : पुढारी वत्तसेवा :  भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे असे भाजपाचे तीन दिग्गज नेते नगर शहराच्या तीन दिवसांच्या दौर्‍यावर येत आहेत, अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी दिली. 17, 18 व 19 नोव्हेंबर रोजी होणार्‍या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी सावेडी येथील संपर्क कार्यालयात बैठक झाली. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी आदी उपस्थित होते.

गुरुवारी (दि. 17) केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते नगर रेल्वेस्थानकावर आष्टी ते मुंबई जाणार्‍या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. तसेच, शुक्रवारी (दि. 18) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नगर दौर्‍यांवर येणार असून, शहरात दुचाकी रॅलीत सहभागी होणार आहेत. दुपारी भाजप पदाधिकार्‍यांच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

शनिवारी(दि.19) केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दुपारी उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमांसाठी भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन गंधे यांनी केले.

लेझर शो नंतर उड्डाणपूल खुला

खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, शनिवारी दुपारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शहरात आगमन होईल. मंत्री नितीन गडकरी उड्डाणपुलावर न जाता उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर शिल्पा गार्डन येथे कार्यक्रम होईल. रात्री 7 ते 8 वाजता उड्डाणपुलावर साउंड, लाईट, लेझर शो व आतिषबाजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नागरिकांना उड्डाणपुलावर न जाता शो पाहण्यासाठी मैदानाची सोय करण्यात आली. या शो नंतर उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला करण्यात येईल.

Back to top button