नाशिक : सिग्नलवरील तिसरा डोळा आता पोलिस नियंत्रणात

नाशिक : सिग्नलवरील तिसरा डोळा आता पोलिस नियंत्रणात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्मार्ट सिटी अंतर्गत तयार झालेल्या रस्त्यांवरील सिग्नलवर लावलेला तिसरा डोळा अर्थात सीसीटीव्ही कॅमेरे सुरू झाले असून, त्यांचा कंट्रोल पाच वर्षांनंतर पोलिसांकडे आला आहे. सीसीटीव्हीचे कमांड कंट्रोल रूममध्ये फीड करण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील ४५ सिग्नलवरील वाहतुकीचे चित्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील एलसीडी वॉलवर बघता येत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी फोडण्यासोबतच बेशिस्त चालकांना दणका देण्याचे काम पोलिसांना नियंत्रण कक्षातूनच करता येणार आहे.

पोलिस आयुक्तालयातील वाहतूक शाखेचे कार्यालय पुन्हा शरणपूर रोडवरील जुन्या जागेत स्थलांतरित करण्यात आले आहे. त्या ठिकाणी आपत्कालीन प्रतिसाद केंद्र सुरू होत असून, आयुक्तालयाच्या सुसज्ज नियंत्रण कक्षात 'कमांड कंट्रोल रूम' कार्यान्वित झाली आहे. या ठिकाणी अनेक वर्षांपासून बसवलेल्या सीसीटीव्हींचा फीड मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पोलिसांना एकाच ठिकाणी बसून शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवता येत असून, वाहतूक खोळंबा झाल्यास काही क्षणांत त्यांना तोडगा काढता येणे शक्य होणार आहे. शहरातील गुन्ह्यांसह गुन्हेगारांच्या हालचालींवरही पोलिसांना याद्वारे लक्ष ठेवता येत आहे. एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली नियंत्रित करण्यासह सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण शहरावर नजर राहणार आहे. या केंद्रात वायफाय सुविधा, स्मार्ट सिटी ऑपरेशन सेंटर, हेल्पडेस्क या सुविधादेखील कार्यान्वित करण्यात येत आहेत.

वाहतूक कोंडीचे अपडेट क्षणाक्षणाला

नियंत्रण कक्षात ६ बाय ४ फुटांची एलसीडी वॉल बसवली आहे. १६ डबल पॅनलचे मॉनिटरही असून, त्यावर ४५ सिग्नलच्या सीसीटीव्हींचे चित्रीकरण बघता येईल. गूगल मॅपद्वारे सिग्नल्स व वाहतूक कोंडीचे अपडेट क्षणाक्षणाला जाणून घेता येते. सिग्नल मोडणारे, झेब्रा क्रॉसिंग, यू-टर्न घेणाऱ्यांसह इतर वाहतूक नियम मोडणाऱ्यांवरही या प्रणालीद्वारे लक्ष ठेवता येणार असून, त्यांना ई चलानद्वारे दंड आकारला जाईल.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news