नगर तालुका : नागवडे यांचा भाजपमध्ये प्रवेश; बाजार समितीच्या निवडणुकीत आघाडीला धक्का | पुढारी

नगर तालुका : नागवडे यांचा भाजपमध्ये प्रवेश; बाजार समितीच्या निवडणुकीत आघाडीला धक्का

नगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : नगर तालुका बाजार समितीची निवडणूक अंतिम टप्प्यात असताना बाजार समितीचे माजी संचालक वाल्मीक नागवडे यांनी महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. तालुक्यातील गुणवडी येथील आघाडीचे खंदे समर्थक, माजी सरपंच वाल्मीक नागवडे यांच्यासह समर्थकांनी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याने आघाडीला धक्का बसला आहे.

आघाडीच्या गोटात नागवडे यांचे मोठे वलय होते. त्यांच्या संपर्काचा आघाडीला अनेक वेळा फायदा झाला. अनेक दिवसांपासून एकनिष्ठ राहून न्याय मिळाला नाही, असे सांगून नागवडे यांनी माजी आमदार कर्डिले, खासदार सुजय विखे यांचे नेतृत्व मान्य केले आहे. आगामी काळात खासदार सुजय विखे व कर्डिलेे यांच्या नेतृत्त्वाखाली काम करणार असल्याचे सर्वच समर्थकांनी सांगितले. या वेळी शरद बोठे, रमेश भांबरे, अजिंक्य नागवडे, धनंजय नागवडे, नितीन नागवडे यांच्यासह समर्थक उपस्थित होते.

Back to top button