नाशिक : हॉल तिकीटवर तारीख आजची, परीक्षा मात्र कालच झाली; बीएड सीईटी परीक्षेत गोंधळ | पुढारी

नाशिक : हॉल तिकीटवर तारीख आजची, परीक्षा मात्र कालच झाली; बीएड सीईटी परीक्षेत गोंधळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

एमबीए व एमएमएस अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेतील गोंधळाची घटना ताजी असतानाच बुधवारी (दि.२६) नाशिकमध्ये बीएड सीईटी परीक्षेत पुन्हा गोंधळ उडाला होता. हॉल तिकीटवर परीक्षेची तारीख २६ एप्रिल असल्याने उमेदवार संबंधित केंद्रावर दाखल झाले. मात्र, तिथे परीक्षा कालच झाल्याचे समजल्याने उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली. अखेर जिल्हा युवक काँग्रेससह आमदार सत्यजित तांबे यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे संबंधित उमेदवारांना अन्य केंद्रांवर परीक्षा देता आली.

नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात सकाळी 9 ते 10.30 च्या दरम्यान बीएड सीईटी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, हॉल तिकीटवर बुधवार (दि.२६) ची तारीख देण्यात आलेली असताना केंद्रावर मंगळवारी (दि. 25) परीक्षा होऊन गेल्याच महाविद्यालयाकडून सांगण्यात आल्याने उमेदवारांची तारांबळ उडाली. नंदुरबार जिल्ह्यातून जवळपास दोनशे ते अडीचशे किलोमीटर अंतरावरून नाशिकमध्ये येऊन पोहोचलेल्या उमेदवारांना सीईटी सेलच्या गोंधळाचा त्रास सहन करावा लागला.

नाशिक जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्निल पाटील आणि शिक्षक आमदार सत्यजित तांबे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला. जिल्हाध्यक्ष पाटील यांनी घटनास्थळी जाऊन विद्यार्थी व कंपनी अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधून आजच पुनर्परीक्षा घेण्याची मागणी लावून धरली. शहरातील जेएमसीटी आणि जीआयटी या महाविद्यालयांमध्ये परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्यात आली. पाटील यांनी उमेदवारांसाठी वाहनव्यवस्था उपलब्ध करून दिली. सकाळी अकरा ते साडेबारा या वेळेत परीक्षा पार पडली.

दरम्यान, नियोजित वेळापत्रकानुसार पडताळणी करून पुनर्परीक्षा घेण्यात आली. बीएड सीईटी प्रकरणी एज्युस्पार्क कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आल्याचे सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सीईटी परीक्षांमध्ये वारंवार गोंधळ उडत आहे. राज्य शासनाने ऑनलाइन एक्झामचे कंत्राट घेतलेल्या एज्यु स्पार्क कंपनीवर कारवाई करण्याची गरज आहे. आगामी काळातील सीईटी परीक्षेत गोंधळ टाळण्यासाठी तसेच राज्य शासनाने सक्षम यंत्रणा उभारण्याच्या मागणीचे निवदेन लवकरच मुख्यामंत्र्यांना देणार आहे.

– स्वप्निल पाटील, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस, नाशिक

हेही वाचा : 

Back to top button