पुढारी ऑनलाईन डेस्क : सिनेविश्वातील काही कलाकार मंडळी ही स्वमेहनतीने आपलं स्थान सिनेसृष्टीत निर्माण करतात. कोणताही गॉडफादर नसताना आपल्या अंगी असलेल्या कलागुणांमुळे वा अंगी असलेल्या हिमतीमुळे ही कलाकार मंडळी सिनेमाविश्वात आपलं स्थान भक्कम करतात. या यादीत बरीच नाव घेता येतील. मात्र एक नाव असं आहे, ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ते नाव म्हणजे अभिनेता, निर्माता अमोल कागणे. फार कमी वयात यशाची पावलं चढणाऱ्या या कलाकाराने आज सिनेमाविश्वात आपल्या नावाचा डंका गाजवलाय. असा हा हरहुन्नरी कलाकार नव्याने 'बलोच' या भव्य ऐतिहासिक चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकण्यास पुन्हा एकदा सज्ज होत आहे.
मराठ्यांची आणखी एक शौर्यगाथा मांडणारा 'बलोच' चित्रपट आहे. पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले मराठे, दरम्यान तेथील भयाण वास्तवाला ते कसे सामोरे गेले, याचे चित्रण 'बलोच'मध्ये असणार आहे. मोहम्मद शाह अब्दाली यांच्या सैन्यदलातील एक सुभेदार ज्याचा या चित्रपटात प्रमुख वाटा आहे. सरफराज असे त्या सुभेदाराचे नाव आहे. या पात्राची लीलया चित्रपटात अमोल कागणे याने संभाळली आहे. प्रवीण तरडे यांच्यासोबत अमोलचा अभिनय मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरणार आहे.
'बलोच' हा सिनेमा अमेय विनोद खोपकर, विश्वगुंज पिक्चर्स, कीर्ती वराडकर फिल्म्स आणि अमोल कागणे स्टुडिओज प्रस्तुत असून या चित्रपटाचे दिग्दर्शक, कथा, पटकथाकार प्रकाश जनार्दन पवार आहेत. तर महेश करवंदे (निकम), जीवन जाधव, गणेश शिंदे, दत्ता काळे, जितेश मोरे, संतोष बळी भोंगळे, नेमाराम चौधरी, बबलू झेंडे, गणेश खरपुडे, ज्ञानेश गायकवाड निर्माते असून पल्लवी विठ्ठल बंडगर, सुधीर वाघोले, विजय अल्दार हे सहनिर्माते आहेत.
येत्या ५ मे रोजी 'बलोच' प्रदर्शित होणार आहे.